पुणे - शहरात बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला. शहराच्या अनेक भागात पावसाचे पाणी तुंबले तर शहरातून वाहणाऱ्या नाल्यांचे पाणी नागरी वस्तीत शिरल्याने अनेक भाग जलमय झाले. शहरातील नांदेड सिटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पासलकर पुलाखाली पाण्याच्या लोंढ्यात चारचाकी वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झाला. किशोर गिरमे असे पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्या कार चालकाचे नाव आहे.
पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या पावसाने अक्षरश: थैमान माजवले. या अतिवृष्टीत शहरातील अनेक भागात पावसाचे पाणी साचून परिसर जलमय झाल्याने नागरिकांचे हाल झाले. रात्रीच्या वेळी नांदेड सिटीकडे जाणारी चारचाकी पावसाच्या पाण्यात वाहुन गेली. यामध्ये कार चालकाचा मृत्यू झाला असून, यात दगावलेल्यांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती आहे. याशिवाय वडगाव पुलाजवळ लावलेले अनेक वाहन या पाण्यात वाहून गेले. रिक्षा चारचाकी तसेच दुचाकींचे देखील पावसात मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा - पावसाचा हाहाकार; पुण्यात भिंत कोसळून ५ जणांचा मृत्यू
कात्रज कोंढवा रस्त्यावर महापूर आल्याची परिस्थिती होती. कात्रज येथे पुलाखाली उभ्या केलेल्या 50 हुन अधिक चारचाकी, दुचाकी, रिक्षा वाहुन गेल्या. तर, एका वृद्ध महिलेला वाचवण्याचा प्रयत्न करणारादेखील पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परिसरातील लेक टाऊन येथील 10 दुचाकी, सिमेंटचा रस्ताही वाहून गेला. त्यामुळे लेकटाऊनकडून राजस सोसायटीकडे जाणारा रस्ता आता पुढील काही दिवस बंद राहील अशी स्थिती आहे.
हेही वाचा - पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, अनेक रस्ते जलमय
अतिवृष्टीमुळे पद्मावती पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने सर्व पंप / मोटार नादुरूस्त झाले आहेत. त्यामुळे पद्मावती पंपिंग स्टेशनवर अवलंबून असणाऱ्या खालील भागांना पाणी पुरवठा होणार नाही. तर, संपूर्ण बिबवेवाडी, कोंढवा, मर्केट यार्ड परिसर, धनकवडी, बालाजी नगर, सहकार नगर परीसर सातारा रोड परीसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
हेही वाचा - पुणे-नगर महामार्गावर खड्ड्यांमुळे मोठी वाहतूक कोंडी; प्रवाशांचे हाल