पुणे -दक्षिण मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे सध्या मध्य महाराष्ट्रासह अनेक भागात अवकाळी पाऊस पडत आहे. गुरुवारी सायंकाळी आणि शुक्रवारी पुन्हा संध्याकाळी पुणे शहरातील अनेक भागात जोरदार पाऊस पडला आहे.
पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊसाची हजेरी काही ठिकाणी जोरदार पाऊस
राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. पुणे शहर परिसरात पून्हा ढगाळ वातावरण होते. त्यानंतर शहरातील तसेच उपनगरातील काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून ऊन आणि संध्याकाळी 5 च्या सुमारास आभाळ गच्चं भरून आले होते. यावेळी ढगांच्या जोरदार गडगडाटासह शहरात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.
3 मेपर्यंत पावसाचा अंदाज
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम विदर्भ ते अंतर्गत कर्नाटक मार्ग दक्षिण तामिळनाडूपर्यंत असलेली कमी दाबाचा पट्टा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रावर असलेली हवेची चक्रीय स्थिती यामुळे ही परिस्थिती तयार झाली असून 3 मे पर्यंत राज्यात मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपात पाऊस पडेल असा अंदाज विभागाने वर्तविला आहे.