पुणे - नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांचा वापर होण्याची शक्यता गृहीत धरून या पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे लोहमार्ग पोलिसांमार्फत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत तब्बल 34 किलो 400 चरस पोलिसांनी हस्तगत केले.
दिल्लीहून येणाऱ्या रेल्वेंवर सात दिवसांपासून नजर
लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे यांचे बॅचमेट असलेल्या हिमाचल प्रदेशातील एका पोलीस अधिकाऱ्याने पुणे शहरात अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांची चार पथके सतत सात दिवस दिल्लीहून येणाऱ्या सर्वे रेल्वे गाड्यांवर करडी नजर ठेवून होते.
वाडिया पुलाखाली रचला होता सापळा
शनिवारी (19 डिसेंबर) पुणे रेल्वे स्थानक परिसरातील वाडिया पुलाखाली दोन व्यक्ती अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी तीन वेगवेगळ्या पथकाच्या मदतीने त्याठिकाणी सापळा रचला होता. यादरम्यान रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी आलेल्या दोन व्यक्तीना पोलिसांनी ताब्यात घेतले.