पुणे - पुण्यातून गेल्या तीन दिवसांपासून गायब असलेली मुलगी गोव्यातील मडगावच्या कोलवा गावात सापडली ( Kuchik Case lost girl found in Goa ) असल्याची माहिती भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी दिली आहे. गायब झालेल्या तरुणीने शिवसेना नेते रघुनाथ कुचीक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला ( Raghunath Kuchik Case ) होता.
चित्रा वाघ यांनी दिली माहिती -
चित्रा वाघ यांनी सांगितले, की काल रात्री त्या पीडित मुलीचा फोन मला आला होता. तीने मला असे सांगितले की मी पुण्याकडे येत असताना काही लोकांनी इंजेक्शन देऊन पुण्यातून बाहेर नेले आहे. यात पोलीस ही होते असे तिने सांगितले आहे. या साऱ्यांनी पीडितेला महाराष्ट्रातून बाहेर नेल्याची धक्कादायक माहिती त्या पिडीतेने मला सांगितली आहे, यासंदर्भात पुणे पोलिसांना सविस्तर कळवले असल्याचे भाजपा नेते चित्रा वाघ यांनी माहिती दिली आहे.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी पुण्यात शिवसेना नेते रघुनाथ कुचीक यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीत पीडितेने सांगितले होते, की लग्नाची आमिष दाखवून शिवसेना नेते कुचीक यांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शारीरिक संबंध ठेवले. त्यात ती पीडिता प्रेग्नेंट झाली होती. त्यानंतर आरोपीने बळजबरीने तरुणीचा गर्भपात केला. या साऱ्या प्रकाराबद्दल कोणाला सांगितले तर जीवे मारीन अशी धमकी देखील दिली होती. असे तक्रारीत म्हटलेले आहे. या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये रघुनाथ कुचीक यांच्याविरोधात कलम ३७६,३१३ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक पाटील करत आहेत.