पुणे - वाहतूक शाखेच्या पोलिसांनी 2019 सालचा अहवाल नुकताच सादर केला आहे. या अहवालानुसार गेल्या वर्षात वाहतूक नियमभंगाच्या 27 लाख 59 हजार 229 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तर, दंडापोटी एकूण 111 कोटी 74 लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक तक्रारी या विनाहेल्मेटच्या असून त्यांची संख्या तब्बल 17 लाख 5 हजार इतकी आहे. पोलीस आयुक्तालयाच्या 24 वाहतूक विभागाअंतर्गत व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
शहरातील अपघाताचे प्रमाण कमी व्हावे व वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी वाहतूक शाखेने विशेष मोहिमांचे आयोजन करून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्ही आणि ई-चलन डिव्हाईस मशिनद्वारे कारवाई केली. परिणामी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात अपघाताच्या संख्येत घट झाल्याचे समोर आले आहे. 2018 मध्ये झालेल्या 240 प्राणांतिक अपघातात 253 नागरिकांचा मृत्यू झाला होता. 2019 मध्ये हे प्रमाण घटले असून 199 प्राणांतिक अपघातात 206 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 2019 साली अपघातांच्या संख्येत 17 टक्क्यांनी घट झाली आहे.
हेही वाचा -'प्लास्टिकची अंडी' ही अफवाच, 'संडे हो या मंडे बिनधास्त खा अंडे'