पुणे :देशभरात टोमॅटोच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. अनेक राज्यांमध्ये टोमॅटो तब्बल 100 ते 200 रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता ठिकठिकाणी टोमॅटो चोरीच्या घटनाही उघडकीस येत आहेत.आतापुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने 400 किलो टोमॅटोच्या चोरीचा आरोप करत पोलिसांकडे धाव घेतली आहे. टोमॅटोच्या चोरीमुळे आपले सुमारे 20 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्याने पोलिसांना सांगितले आहे.
20 टोमॅटो क्रेटची चोरी : ही घटना पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील आहे. फिर्यादी शेतकरी अरुण ढोमे यांनी पोलिसांना सांगितले की, रविवारी त्यांनी त्यांच्या शेतातून टोमॅटोची काढणी केली आणि मजुरांच्या मदतीने टोमॅटो घरी आणले. मात्र, सोमवारी सकाळी ढोमे यांना जाग आली तेव्हा त्यांना 400 किलो वजनाचे 20 टोमॅटो क्रेट गायब झाल्याचे आढळले. आपले टोमॅटो चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर ढोमे यांनी शिरूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.