पुणे :कोथरूड पोलिसांनी युसूब साकी आणि मोहम्मद खान या दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांचा मास्टरमाईंड झुल्फिकार बडोदावाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बडोदावालाला एनआयनेने 23 जुलै रोजी मुंबईतून अटक केली होती. 2017 ते 2022 पर्यंत तो पुण्यातील कोंढवा परिसरात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने दोन्ही दहशतवाद्यांना सासवडच्या घाटात बॉम्बचे प्रशिक्षण दिल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
मॉडेलचा महत्त्वाचा दुवा :झुल्फिकार बडोदावाला हा पुणे मॉडेलचा महत्त्वाचा दुवा होता. त्याने आरोपींना बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण, तसेच बॉम्बसाठी लागणारे साहित्य खरेदी करून दिले असल्याची माहिती मिळाली आहे. एटीएसने अटक केलेल्या सगळ्या आरोपींशी संपर्क करुन त्याने यांची कोंढाव्यात राहण्याची व्यवस्था केली होती. इम्रान खान, युसुफ साकी, अब्दुल पठाण आणि सिमाब काझी या चारही जणांचा बडोदावाला प्रमुख होता. दर आठवड्याला बैठक घेवून त्याने या चौघांना शपथ देऊन दहशतवादी कारवाईत ओढले होते. या चौघांना प्रशिक्षिण देऊन तो पडद्यामागून सूत्र हलवत होता.
राजस्थानमध्ये दहशतवादी कारवाया :कोथरूड परिसरामध्ये 18 जुलै रोजी टू व्हीलर गाडी चोरताना पुणे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते. अधिक तपासात ते दहशतवादी असल्याचे समोर आले होते. त्यांचा तपास एटीएसकडे देण्यात आला होता. तपासात ते इसिस प्रणित सूफा दहशतवादी संघटनेचे दहशतवादी असल्याचे समोर आले. त्यांनी राजस्थानमध्ये दहशतवादी कारवाया केल्या होत्या. त्यात फरार असलेले दोन आरोपी हे कोंढवा भागात राहत होते. त्यानंतर ते पुणे पोलिसांच्या हाती लागले. त्यानंतर आता त्यांच्या संदर्भात सर्व तपास एटीएस करत आहे.