पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावरचा वाद वाढतच आहे. राज्यपालांच्या शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावर राज्यात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. ठिकठिकाणी आंदोलन करत राज्यपालांचा निषेध करण्यात आला. यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यासमोरच डुप्लिकेट कोश्यारी यांचे धोतर फेडून निषेध करण्यात आला ( NCP Aggressive On Governor Statement ) आहे.
धोतर फेडणाऱ्याला लाखाचे बक्षीस :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याकडून राज्यपालांचे धोतर फेडणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस असे बॅनर ( One Lakh Reward Who Tear Governor Dhoti ) लागले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना जाणून-बुजून भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाठीशी घालत आहेत. सावरकरांविषयी वक्तव्यावर प्रतिक्रिया देणारे मुख्यमंत्री, आज काहीच बोलत नाहीत.पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा ,देवेंद्र फडवणीस ,यांना आम्ही विनंती करतो, की त्याने कोश्यारीची ताबडतोब हकालपट्टी करावी. अन्यथा महाराष्ट्रातील जनता छत्रपतींच्या स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहे. मग जर त्यांची हकालपट्टी नाही केली. तर आम्ही कुठल्याही क्षणी कुठेही राज्यपालाचे धोतर फेडू. अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मांडली ( Protest Tear Governor Koshyari Dhoti ) आहे.
राज्यपालांना पाणी पाजू :गिरगाव चौपाटीवर शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 'नायक नहीं, नालायक हूँ मै, उडाला, उडाला, ताडमाड उडाला, राजभवनाच्या समुद्रात बुडाला, ५० खोके एकदम ओके' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. सुधांशु त्रिवेदी यांच्या विरोधातही संताप व्यक्त करण्यात आला. शिवसेनेचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली गिरगाव चौपाटीसमोरील प्रेक्षक गॅलरी येथे तीव्र आंनदोन करण्यात आले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाग घेऊन, सतत वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्यपालांना महाराष्ट्राचे पाणी पाजू, असा थेट इशारा दिला.
आंदोलनकर्त्यांची धरपकड : पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड करत ताब्यात घेतले. छत्रपती शिवाजी महाराज मराठी माणूस, महाराष्ट्र, हिंदू नव्हे तर संपूर्ण हिंदुस्तानचे आदर्श राहणारे व्यक्तिमत्व आहेत. राज्यपाल कोश्यारी सातत्याने महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी वादग्रस्त विधाने करत आहेत. दिल्लीच्या बादशहाच्या इशाऱ्यांवरून सतत वक्तव्य करत आहेत, अशी शंका येते. तसेच कोश्यारीकडून सातत्याने महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना महाराष्ट्राचे पाणी पाजल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला.महाराष्ट्राच्या महापुरुषांच्या बाबतीत असे का होत आहे. उत्तराखंडच्या बाबत का होत नाही. कारण, महाराष्ट्र खऱ्या अर्थाने महापुरुषांची, देशभक्तांची आणि स्वातंत्र्यवीरांची जननी आहे. महाराष्ट्राला डॅमेज करायचा जाणीवपूर्वक हा प्रयत्न होताना दिसत असल्याचे दानवे यांनी सांगितले. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रतिमे समोर आंदोलन : पुण्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रायगडावर येऊन नतमस्तक होत महाराष्ट्राची माफी मागावी, नाहीतर शिवसेना त्यांना पुण्यात फिरू देणार नाही. अशी आक्रमक भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने आंदोलन करून इशारा दिला आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिमे समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी काही महिला शिवसैनिकाने भारतीय जनता पार्टीचे हे कटकारस्थान असून यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वंशज आहेत ते सुद्धा जाऊन बसलेत त्यांनी कुठेतरी या विरोधात भूमिका घेतली पाहिजे आणि त्यातून बाहेर पडले पाहिजे असे भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे.पुण्यातील अलका चौकामध्ये हे निषेध आंदोलन करण्यात आले. राज्यपालांना परत बोलवा .राज्यपालाने महाराष्ट्राची माफी मागावी .रायगडावर जाऊन नतमस्तक व्हावे .मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाने केलेली आहे. भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, गोपीचंद पडळकर, राज्यपाल, यांनी रायगडावर यावं ,रायगडावर नतमस्तक व्हावं त्याचं लाईव्ह प्रक्षेपण करुन ,महाराष्ट्राचे त्याने माफी मागावी .अशी आक्रमक भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाने घेतलेली आहे.
राज्यपालांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन : नाशिकच्या येवलात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याने या वक्तव्याचे पडसाद उमटले. येवल्यातील ठाकरे गटाच्या शिवसेना, युवासेना तसेच महिला आघाडीच्यावतीने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध करत तहसील कार्यालयावर राज्यपालांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोश्यारींविरोधात घोषणाबाजी :छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल राज्यपालं भागतसिंग कोश्यारी यांनी बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील केळवद येथील शिवराणा विचार मंचच्यावतीने शहरातून राज्यपालं कोशियारी यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. या प्रेतयात्रेत महिला असंख्य पुरुष सामील झाले होते. प्रेत्यात्रेत राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. प्रेत्यात्रेत पुढे माणसपुत्र हातात मडके घेऊन चालत होते. तर मागे कोश्यारींविरोधात घोषणाबाजी सुरु होती.
विविध ठिकाणी निषेध मोर्चे : नागपूरात राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना (ठाकरे गट), नागपुर ग्रामीण युवक कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून शहरात विविध ठिकाणी निषेध मोर्चे काढून जोरदार आंदोलने करण्यात आले. सुधांशू त्रिवेदी यांनी आपल्या भाषणामध्ये शिवाजी महाराज यांनी औरंगजेब यांना ५ वेळा पत्र लिहून माफी मागितली असे वादग्रस्त विधान केले आहे. ही विधाने अतिशय बेजबाबदारपणाचे आहे दोघांनी बिनशर्त माफी मागावी अशी मागणी करत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दूनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वाखाली वेरायटी चौक येथील गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. त्याशिवाय शिवसैनिक, महिला आघाडी, युवासेनेकडून आंदोलन करण्यात आले. राज्यपाल हटाव अशी मागणी युवक कॉंग्रेसकडून करण्यात आली. आम आदमी पक्षाचे कार्यकर्तेदेखील रस्त्यावर उतरले.