पुणे- सहायक प्राध्यापक भरतीवरील बंदी तात्काळ उठवावी. विनाअट 100 टक्के प्राध्यापक पदभरती महाविद्यालये व अकृषी विद्यापीठांच्या शैक्षणिक विभागात त्वरित सुरु करावी. यासह विविध मागण्यांसाठी उच्च शिक्षण संचालनाबाहेर गेल्या 49 दिवसांपासून प्राध्यापक पदभरती विरोधात आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेच्यावतीने रविवारी (दि. 5 सप्टेंबर) शिक्षक दिनाच्या निमित्ताने तोंडाला काळ फासून शासनाचा निषेध करण्यात आला.
अन्यथा तीव्र आंदोलन करू
गेल्या 49 दिवसांपासून उच्च शिक्षण संचालनाबाहेर प्राध्यपकांचे प्राध्यापक पदभरती बंदी विरोधात आंदोलन करत आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन ही त्यांनी फक्त आम्हाला गाजर दिले आहे. आमची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. या सरकारमध्ये समन्वय नसून हे एकमेकांवर चेंडू फेकल्यासारखे आमचे प्रश्न एकमेकांवर ढकलत आहे. जोपर्यंत प्राध्यापक भरती होत नाही तोपर्यंत आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी आंदोलकांनी सरकारला दिला आहे.
100 टक्के जागा लवकरात लवकर भरण्यात याव्या
यापूर्वी आम्ही मुंडण, अर्धनग्न आंदोलन केलं आहे.आज शिक्षकदिनानिमित्ताने तोंडाला काळ फासून आंदोलन करण्यात येत आहे. शासनाने कुठेही तोंड दाखवायाला जागा ठेवलेली नाही. आजचा शिक्षक दिन हा काळा शिक्षक दिन म्हणून आम्ही साजरा करत आहोत. शासनाचा निषेध म्हणून आम्ही प्रतिकात्मक आमचे तोंड काळा करून आंदोलन करत आहोत. प्राध्यापक भरतीच्या 18 हजार जागा महाराष्ट्रात आहे. सरकार 4 हजार जागा भरणार आहेत. त्या 4 हजार जागा त्वरित भरण्यात याव्या. उर्वरित 100 टक्के जागा लवकरात लवकर भरण्यात याव्या. सरकारमधील मंत्री पांढरे कपडे घालून जर शिक्षकांचे तोंड काळे करत असतील तर उद्या त्यांचेही भवितव्य अंधारात आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असेही यावेळी आंदोलक शिक्षकांनी म्हटलं आहे.
या आहेत प्रमुख मागण्या
- सहायक प्राध्यापक पदभरतीवरिल बंदी तात्काळ उठवावी. विनाअट शंभर टक्के प्राध्यापक पदभरती महाविद्यालये व अकृषी विद्यापीठांच्या शैक्षणिक विभागात त्वरित सुरू करावीत.
- ऑक्टोबर 2017च्या आकृतिबंधाला अंतिम मंजुरी देऊन जून, 2021 पर्यंतची सर्व रिक्त पदे भरण्यात यावी.
- सीएचबी (तासिका तत्व)ला पर्यायी व्यवस्था म्हणून केंद्रीय विद्यापीठाच्या धर्तीवर प्रतिदिवस पंधराशे रुपये मानधन देऊन प्राध्यापकांची नेमणूक वर्षातील 11 महिन्यांसाठी करण्यात यावी.
- तासिका तत्वावर सहायक प्राध्यापक म्हणून केलेल्या कामाचा अनुभव हा कायम नियुक्तीनंतर ग्राह्य धरण्यात यावा.
- शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये सीएचबी प्राध्यापकांची नियुक्ती 1 नोव्हेंबर, 2020 पासून गृहीत धरून त्यांना पूर्ण शैक्षणिक वर्षाचे मानधन देण्यात यावे. 24 फेब्रुवारी, 2021 चे आपले पत्र रद्द करावे.
- मराठवाड्यातील औरंगाबाद व नांदेड या अकृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील येणाऱ्या सर्व विषयांच्या दुसऱ्या पदाला तात्काळ मान्यता देण्यात यावी किंवा सर्व विद्यापीठाचा कार्यभार एक समान करावा.
- राज्यातील अनुदानित महाविद्यालयातील कायमस्वरुपी विनाअनुदानित तुकड्यांना व कायमस्वरूपी विनाअनुदानित महाविद्यालयांना तात्काळ अनुदान द्यावे.
- राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांचे शासकीय महाविद्यालये तात्काळ सुरू करावित.
हेही वाचा -व्हॉट्सअॅप हॅक करून आईच्या प्रियकराला ब्लॅकमेल करत मागीतली खंडणी ; 21 वर्षीय तरुणी प्रियकरासह गजाआड