पुणे- हुतात्मा हेमंत करकरे यांच्याविषयी साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वादग्रस्त विधानामुळे संपूर्ण देशवासियांच्या भावना दुखावल्या आहेत. केवळ साध्वीने माफी मागून चालणार नाही. तर ज्यांनी तिला तिकीट दिले त्या भाजपने तसेच तिच्या विधानाचे समर्थन करणाऱ्या नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी. साध्वी प्रज्ञा सिंहचे समर्थन करताना मोदींना लाज कशी वाटली नाही, अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
पुणे मतदारसंघाचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, खासदार वंदनाताई चव्हाण आदी उपस्थित होते.
आपल्यापेक्षा हुशार माणसे जर आपल्यासोबत असतील तर आपली प्रतिमा झाकोळून जाईल, याची भीती नरेंद्र मोदींना वाटते. म्हणून हुशार माणसाला त्यांनी बाजूला केले. रघुराम राजन, उर्जित पटेल, डॉ. अरविंद सुब्रमण्यम यासारखे आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या व्यक्ती मोदींसोबत काम करायला तयार नाहीत. आता नरेंद्र मोदींच्या हातात जर परत सत्ता दिली तर अर्थव्यवस्थेचे काही खरे नाही. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था वाचवायची असेल तर या सरकारला पाडले पाहिजे. बुद्धिमान असणाऱ्या व्यक्तिच्या हातात यापुढे अर्थव्यवस्था दिली पाहिजे, असे मतही चव्हाण यांनी व्यक्त केले.
पुलवामा हल्ल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी सरकारला आधीच दिली होती. पण सरकारचा निष्काळजीपणा या हल्ल्याला कारणीभूत ठरला. या सरकारने पुलवामा हल्ल्याची चौकशी करावी अन्यथा आमचे सरकार आल्यास आम्ही चौकशी करू असेही चव्हाण म्हणाले. जो माणूस आपल्या शिक्षणाची कागदपत्रे दाखवू शकला नाही तो देशाची अर्थव्यवस्था काय सांभाळणार, अशी टीकाही चव्हाण यांनी केली.