कानपूर :Threatened to bomb 40 flights :कानपूरमधील एका 15 वर्षीय विद्यार्थ्याने पुणे विमानतळावर प्रँक कॉल करून इंडिगोच्या 40 विमानांवर निवासी भागात बॉम्ब टाकला जाईल अशी धमकी देणारा फोन केला होता. हा फोन (11 जानेवारी) रोजी केला होता. या फोन नंतर सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली होती. पोलिसांनी सांगितलं की, या मुलाने आपल्या वडिलांच्या मोबाईलवरून पुणे विमानतळावरील इंडिगोच्या नोंदणीकृत कार्यालयावर धमकीचा कॉल केला होता. त्यानंतर कानपूर जिल्ह्यातील सेन पारा पश्चिम भागात पोलिसांनी पाळत ठेवून मुलाचा शोध घेतला. त्याला अटक केली असून त्याच्याकडे या प्रकरणाचा शोध घेतला. आपल्याला 'प्रसिद्ध व्हायचं आहे' म्हणून हा कॉल केला अशी माहिती त्या तरुणानं दिल्याचं तपासात समोर आलय.
सेन पश्चिम पारा भागात लोकेशन ट्रेस : हा फेक कॉल 11 जानेवारी रोजी आला होता. इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी दिल्ली पोलिसांना ही माहिती दिली, पोलिसांनी इंटेलिजन्स ब्युरो (IB) ला अलर्ट केलं. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस महासंचालकांना ही माहिती मिळाली. पुढे कानपूर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला. तपासादरम्यान, मोबाईल फोनचं लोकेशन जिल्ह्यातील सेन पश्चिम पारा भागात ट्रेस करण्यात आलं. गुन्हे शाखेचं एक पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यानंतर तेथून या तरुणाला ताब्यात घेतलं. हा मुलगा मूळचा कुशीनगरचा रहिवासी आहे.
मीडियामध्ये प्रसिद्ध व्हायचं होतं म्हणून केला कॉल : गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त सलमान ताज पाटील यांनी सांगितलं की, आम्ही मुलाला चौकशीसाठी पोलीस कोठडीत घेतलं आहे. ज्या मोबाईलवरून कॉल करण्यात आला होता तो पुढील तपासासाठी जप्त करण्यात आला आहे. 'पोस्ट प्रभारीच्या तक्रारीवरून, आयपीसीच्या कलम 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. चौकशीदरम्यान, मुलाने तपासकर्त्यांना सांगितलं की, त्याला मीडियामध्ये प्रसिद्ध व्हायचं होतं म्हणून त्याने कॉल केला होता.