पुणे - सरकारचे अनलॉक फक्त मोबाईलच्या कॉलरट्यूनवर दिसत आहे. प्रत्यक्षात ते लागू करा, अन्यथा 10 तारखेनंतर वंचित बहुजन आघाडी राज्यसरकार विरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला. त्यांनी पुणे येथे आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
कोरोना लॉकडाऊनमुळे व्यवसाय, उद्योगधंदे बंद पडल्याने अनेकांचे रोजगार गेले. परिणामी लोकांवर उपासमारीची वेळ आली. मागील वर्षभरात जेवढी माणसे दगावली तेवढेच या कोरोनाच्या काळात दगावली आहेत. त्यामुळे आता तरी शासनाने कोरोनातून बाहेर पडावे आणि सर्व व्यवहार सुरू करावेत, अशी मागणी आंबेडकरांनी केली.
अनलॉकच्या नावाखाली शासनाने दुकानासंदर्भात जो सम-विषम निर्णय घेतला आहे, तो संपवला पाहिजे. खासगी वाहनांना परवानगी दिली. मात्र, राज्यातील एसटी महामंडळाची सेवा बंद आहे. या कर्मचाऱ्यांना पगार मिळालेले नाहीत. परिणामी त्यांच्या कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सरकारने आता कोविड-कोविड करणे थांबवावे. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड कसे देणार ते सांगावे, असे आंबेडकर म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी निर्णय घ्यायला शिकावे. जातीचा नेता होऊ शकतो, धर्माचा नेता होऊ शकतो. मात्र, आता उद्धव ठाकरे यांनी राज्याचा नेता होऊन दाखवावे. राज्याचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे. सर्व निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या माथी दिला आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.