पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 1 ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. पुण्यात आल्यावर पंतप्रधान दगडूशेठ मंदिरात पूजा करणार आहेत. यानंतर त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार :या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारही स्वीकारतील, असे पंतप्रधान कार्यालयाने (PMO) निवेदनात म्हटले आहे. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील दोन कॉरिडॉरच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील, असे पीएमओने म्हटले आहे. 2016 मध्ये पंतप्रधानांनी या प्रकल्पाची पायाभरणीही केली होती. या मेट्रोमुळे पुणे शहरातील शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय, पुणे महानगरपालिका कार्यालय, पुणे आरटीओ कार्यालय, पुणे रेल्वे स्थानक यांसारखी महत्त्वाची ठिकाणे जोडले जातील.
भूमिगत मेट्रो स्टेशन :देशभरातील नागरिकांना आधुनिक सुविधा, पर्यावरणपूरक शहरी वाहतूक उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने हे उद्घाटन महत्त्वपूर्ण असल्याचे पीएमओने म्हटले आहे. या मार्गावरील काही मेट्रो स्थानकांची रचना छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने तयार करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्टेशन, डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनची रचना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी परिधान केलेल्या पगडी सारखी केली आहे. ज्याला 'मावळा पगडी' देखील म्हणतात. शिवाजी नगर भूमिगत मेट्रो स्टेशनची रचना छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची आठवण करून देणारी असल्याचे पीएमओने म्हटले आहे.
देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन : त्यात पुढे म्हटले आहे की, “आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन हे देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशनांपैकी एक आहे. त्याची सर्वात जास्त खोली 33.1 मीटर आहे. प्लॅटफॉर्मवर थेट सूर्यप्रकाश पडेल अशा पद्धतीने स्टेशनच्या छताची रचना करण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (पीसीएमसी) अंतर्गत वेस्ट टू एनर्जी प्लांटचे उद्घाटन करणार आहेत. सुमारे 300 कोटी रुपये खर्चून विकसित केलेला हा प्रकल्प दरवर्षी सुमारे 2.5 लाख मेट्रिक टन कचरा वीज निर्मितीसाठी वापरेल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत PCMC ने बांधलेली 1 हजार 280 घरे पंतप्रधान सुपूर्द करतील.
PMAY चे देखील करणार उद्घाटन : पुणे महानगरपालिकेने बांधलेली 2 हजार 650 प्रधानमंत्री आवास योजनाच्या ( PMAY ) घरेही ते सुपूर्द करतील. याशिवाय, पिंपरी चिंचवड महापालिकेद्वारे ( PCMC ) बांधण्यात येणार्या सुमारे 1 हजार 190 ( PMAY) घरांचे तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे बांधण्यात येणार्या 6 हजार 400 हून अधिक घरांचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत.