पुणे - बाजारात विकली जाणारी अंडी प्लास्टिकची असल्याच्या तक्रारी काही दिवसांपासून येत आहेत. मात्र, हा केवळ समाज माध्यमातून सुरू असलेला अपप्रचार असून कुठलीच अंडी प्लास्टिकची असू शकत नाहीत, असा खुलासा 'नॅशनल एग्ज कोऑर्डीनेशन कमिटी'च्या वतीने खास डेमोच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
कुठल्याही पक्षाची अंडी फोडल्यास त्याच्या आत कवचाला चिटकलेला एक पापुद्रा असतो. हा पापुद्रा अगदी अलगदपणे कवचापासून वेगळा करता येतो. अंडे शिळे असल्यास हाच पापुद्रा प्लास्टिक सारखा भासतो आणि ती अंडी आपल्याला प्लास्टिकची असल्याचे वाटते. मात्र, प्रत्यक्षात ते खोटं आहे, हे पटवून देण्यासाठी एक चाचणी आहे. अंड्याचा हा पापुद्रा ज्वालांवर पकडला तरी तो सहसा जळत नाही. याउलट प्लास्टिक लगेच पेट घेते. त्यामुळे प्लास्टिकची अंडी ही केवळ अफवा आहे. या अंड्यांबाबत पसरत असलेल्या गैरसमजांच्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रातील तज्ज्ञांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतचा खुलासा केला.