पिंपरी-चिंचवड (पुणे)- शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक कोरोनाचे नवे रुग्ण समोर येत आहेत. तर काही जणांचा मृत्यूही होत आहे. अवघ्या नऊ दिवसांमध्ये सख्ख्या तीन भावांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संबंधित व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्य मानसिक धक्क्यात आहेत.
तिघेही भाऊ घरातील आधारस्तंभ असल्यासारखे एकत्रित कुटुंबात राहायचे. मोठ्या भावाचे वय 66, मधल्या भावाचे वय 63 आणि लहान भावाचे वर 61 वर्ष होते. सख्खे भाऊ असलेल्या तिघांचा एका पाठोपाठ कोरोनाने मृत्यू झाला, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, नागरिकांनी कोरोना महामारीला निष्काळजी पणे पाहू नये, स्वतःची आणि कुटुंबाजी काळजी घ्यावी, असे आवाहन मृत व्यक्तींच्या आप्तेष्टांनी केले आहे.
सविस्तर माहिती अशी की, पिंपरी-चिंचवड शहरात संबंधित कुटुंब हे एकत्रित राहात होते. त्यांच्या कुटुंबात 13 जण मोठे व्यक्ती असून 5 लहान मुले आहेत. दरम्यान, पैकी एकाला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे 5 जुलै रोजी निष्पन्न झाले. त्यामुळे कुटुंबातील उर्वरित व्यक्तींची देखील कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात सर्वांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला. त्यांना तातडीने चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, काही दिवसांमध्ये तीन वयस्कर भाऊ वगळता इतरांची लक्षण सौम्य असल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.