पुणे - दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या तरूणाने पुण्यात मोबाईलचे दुकानातून दीड लाखांची चोरी केली. विजयभाई जिलिया (वय 20) असे या तरूणाचे नाव आहे. पुणे पोलिसांनी त्याचा माग काढत गुजरातमध्ये जाऊन बेड्या ठोकल्या.
दोन्ही पायांनी दिव्यांग तरीही दुकान फोडले!
30 नोव्हेंबरच्या रात्री रास्ता पेठेतील 'न्यु हॅलो मोबाईल शॉपी' या दुकानाचे शटर तोडून रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण दीड लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता चोरटा हा दिव्यांग असल्याचे दिसून आले.
30 नोव्हेंबरच्या रात्री रास्ता पेठेतील 'न्यु हॅलो मोबाईल शॉपी' या दुकानाचे शटर तोडून रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण दीड लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता चोरटा हा दिव्यांग असल्याचे दिसून आले. पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील सीसीटीव्ही तपासून आरोपीचा माग काढला. तो पुणे स्टेशनच्या दिशेने गेल्याचे व तेथून पुढे मुंबईला गेल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी मुंबईला जाऊन आरोपीचा शोध घेतला. तो गुजरातला जाणाऱ्या रेल्वेत बसून निघून गेल्याचे निदर्शनास आले.
पुणे पोलिसांचे एक पथक सीसीटीव्ही चित्रीकरण आणि अन्य पुराव्यांच्या आधारे गुजरातमधील नवसारी येथे पोहचले. त्यानंतर तेथील एका दुर्गम भागातून त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल असा ऐवज जप्त करण्यात आला.