महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आता गिर्यारोहणही होतेय 'अनलॉक'; पुणे जिल्ह्यात सशर्त परवानगी - पुणे गिर्यारोहण परवानगी न्यूज

मार्च महिन्यात देशात कोरोनाने प्रवेश करत धुमाकूळ घातला. त्यामुळे तातडीने लॉकडाऊन करण्यात आले. या काळात सर्वकाही बंद होते. यात गिर्यारोहणाचाही समावेश होता. आता पुणे जिल्ह्यात गिर्यारोहणाला परवानगी देण्यात आली आहे.

Trekking
गिर्यारोहण

By

Published : Nov 3, 2020, 4:57 PM IST

पुणे -पावसाळा संपल्यानंतर गिर्यारोहकांना गिर्यारोहणाचे वेध लागतात. हिरवाईने नटलेल्या निसर्गात फिरण्यासाठी दरवर्षी गिर्यारोहक मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. यंदा पाऊसही चांगला झाला असल्याने पर्वतरांगा खुलल्या आहेत. मात्र, कोरोनामुळे गिर्यारोहकांना घराच्या बाहेर जाता आले नाही. आता पुणे जिल्ह्यात गिर्यारोहण देखील अनलॉक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने गिर्यारोहणाला सशर्त परवानगी दिली.

पुणे जिल्ह्यात गिर्यारोहणाला सशर्त परवानगी देण्यात आली

अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने केली होती मागणी -

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या सात ते आठ महिन्यांपासून गड- किल्ल्यांवर पर्यटनाला आणि चढाईला मनाई करण्यात आली होती. आता 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत जिल्ह्यातील गड किल्ले आणि डोंगर कड्यांवर ट्रेकिंगसाठी जाण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने केली होती. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी 'ट्रेकिंग'ला सशर्त परवानगी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे ट्रेकर्समध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ट्रेकिंगसाठी घालण्यात आलेल्या अटी -

1) ग्रुपमधील सदस्य जास्त असल्यास वेगवेगळे ग्रुप करावेत आणि काही काळाच्या फरकाने ट्रेकिंगसाठी निघावे.
2) ट्रेकिंगच्या एका ग्रुपमध्ये १५ पेक्षा जास्त सदस्य नसावेत व ट्रेकिंगसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात यावे.
3) ट्रेकिंगसाठी प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक राहील व योग्य शारीरिक अंतर राखण्याबाबतचा नियम पाळण्यात यावा.
4) दहा वर्षांच्या आतील मुले आणि पासष्ट वर्षांवरील व्यक्तींना सहभागी करून घेऊ नये व ताप, सर्दी, खोकला असणाऱ्या व्यक्तींचाही समावेश नसावा
5) एकत्रितपणे मुक्काम करू नये. एकमेकांच्या वस्तू उदा: मोबाईल, कॅमेरे एकमेकांनी हाताळू नयेत.

नियम न पाळल्यास होणार कारवाई -

या अटींचा भंग केल्यास आणि विषाणू संसर्ग होईल असे कृत्य केल्यास ट्रेकिंगची परवानगी रद्द केली जाईल. संबंधितांविरुद्ध आपत्ती कायदा आणि साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई केली जाईल, असे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाला प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. अटी आणि शर्ती असल्या तरी ट्रेकिंग करता येणार असल्याने गिर्यारोहक आनंदी झाले असून अनेकांनी ट्रेकिंगचे प्लॅनिंग देखील सुरू केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details