पुणे- लॉकडाऊनमुळे सर्व वाहने, रेल्वे बंद असल्याने हवालदिल झालेले लोक कधी रस्त्यावरून तर कधी रेल्वे ट्रॅक पकडून पायपीट करत गावाकडे निघाले आहेत. मात्र, रेल्वे रुळावरुन चालणं जीवावर बेतणारे आहे, हे औरंगाबादजवळील करमाड रेल्वे दुर्घटनेतून समोर आले आहे. मात्र, तरीही लोक जीवची पर्वा न करत रेल्वे रुळावरुन चालत आपले गाव जवळ करत आहेत. आज पुणे जंक्शनजवळील उरुळी आणि लोणी रेल्वे स्टेशन दरम्यान काही लोक रेल्वे रुळावर चालत होते. त्यावेळी रेल्वे आल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र, लोको पायलटने वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
याबाबात अधिक माहिती अशी की, शुक्रवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुणे जंक्शनजवळील उरुळी आणि लोणी रेल्वे स्टेशन दरम्यान काही लोक रेल्वे रुळवारुन चालत होते. यामध्ये काही लोक आरामात रुळावर सामान घेऊन बसले होते. तर काही जण साहित्य घेऊन चालत होते. दरम्यान त्याचवेळी उरुळीवरून पुण्याला मालगाडी येत होती. तेव्हा मालगाडीच्या लोको पायलटच्या नजरेत ही लोकं आली. त्यावेळी पायलटने हॉर्न वाजवून गाडीचे इमर्जन्सी ब्रेक लावून गाडी थांबवली. मालगाडी या लोकांपासून फक्त 100 मीटर दूरवर येऊन थांबली. त्यामुळे येथील जवळपास 20 लोक गाडीखाली येण्यापासून वाचले आणि मोठी दुर्घटना टळली.