महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णाला जास्त बिल आकारल्याने खासगी रुग्णालयाला नोटीस

महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या दरांनुसार आहेत का याची तपासणी करण्यासाठी एन.अशोक बाबू सह आयुक्त, आयकर विभाग, पुणे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. रहाटणी येथील फिनिक्स हॉस्पिटलकडील १६ रुग्णांच्या वैद्यकीय बिलांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान रुग्णालयाने जास्त दराने वैद्यकीय बील आकारणी केल्याचे आढळून आले. यामुळे हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

pcmc
पिंपरी चिंचवड महापालिका

By

Published : Sep 4, 2020, 9:21 PM IST

पुणे-पिंपरी-चिंचवडमधील रहाटणी येथील फिनिक्स हॉस्पिटलला कोरोनाबाधित रुग्णांकडून महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या दरांपेक्षा जास्त दराने वैद्यकीय बील आकारणे महागात पडले आहे. हॉस्पिटलला पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या पथकाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 48 तासात खुलासा देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यामुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची खासगी रुग्णालयाकंडून लुबाडणूक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा-महापालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात राष्ट्रवादीचे आत्मक्लेश आंदोलन

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची वैद्यकीय खर्चाची बिले ही अवास्तव रकमांची येत आहेत. याबाबत लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून तक्रार प्राप्त झाल्याने रुग्णालयांनी आकारलेली खर्चाची बिले महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या दरांनुसार आहेत का याची तपासणी करण्यासाठी एन.अशोक बाबू सह आयुक्त, आयकर विभाग, पुणे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या समितीने रहाटणी येथील फिनिक्स हॉस्पिटलकडील १६ रुग्णांच्या वैद्यकीय बिलांची तपासणी केली असता शासन निश्चित दरांपेक्षा जास्त दराने वैद्यकीय बील आकारणी केल्याचे आढळून आल्याने हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

एन.अशोक बाबू यांच्या वैद्यकीय समितीने फिनिक्स हॉस्पिटलला भेट देऊन तेथील वैद्यकीय बिलांची तपासणी केली असता हॉस्पिटलने अ‌ॅडमिनिस्ट्रेशन, बेड चार्जेस, आयपीडी, इसीजी, २ डी इको, पॅथोलोजी चार्जेस, एक्स रे चार्जेस शासन निश्चित दरांपेक्षा जास्त आकारल्याचे दिसून आले. तसेच विमा संरक्षित रुग्णाकडून जादा रक्कम घेणे तसेच कोरोना बाधित रुग्णांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार करण्याच्या शासनाच्या सूचना असताना देखील हॉस्पिटलमध्ये सर्व रुग्णांसाठी एकच प्रवेशद्वार असल्याचे समितीस आढळून आले त्याबाबत देखील रुग्णालय प्रशासनाला तातडीने दोन स्वतंत्र प्रवेशद्वार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाबाधित रुग्णांकडून खाजगी रुग्णालयांनी ज्यादा वैयकीय बील आकारले असल्यास याबाबत रुग्णांनी medicalbillaudit@pcmcindia.gov.in व medical@pcmcindia.gov.in या ईमेल वर तसेच ८८८८००६६६६ या क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details