पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरात वीज बिल भरा आणि खासगीकरणापासून वाचवा, असे आवाहन सध्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून केले जात आहे. हिंदी चित्रपटातील गाणी म्हणत हे आवाहन केले जात असून बघ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. खासगीकरण झाल्यास 1 रुपयेऐवजी तुम्हाला 5 रुपये द्यावे लागतील, असेही यातून सांगण्यात आले आहे. वीज बिल भरण्याची विनवणी केली जात असून काही शंका असल्यास नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयात भेट द्या, असे आवाहनही करण्यात येत आहे.
कोरोना काळात आले होते जास्त वीजबिल
सध्या महावितरण हा विषय सर्वात जास्त प्रकाश झोतात आहे. कोरोना महामारीमुळे अनेकांच्या घरात नियमित वीज सुरू होती. त्यामूळे अनेकांना भरमसाठ बिल आली असून काहींना अवाजवी बिल आल्याने ते भरण्यास ग्राहक टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे महावितरणने वीजबिल न भरण्यास थेट वीज तोडण्यास सुरुवात केली होती. याचे पडसाद विधानसभेमध्ये उमटल्याचे आणि राजकारण रंगल्याच सर्वांनीच पाहिले.