पुणे -अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये विविध ठिकाण, व्यवसायदेखील सुरु करण्याची परवानगी दिली जात आहे. मात्र, भाविकांचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे अजूनही बंद आहेत. अनलॉकमध्ये जेव्हा मंदिरे सुरु करण्याची परवानगी दिली जाईल, तेव्हा ती तीन टप्प्यांमध्ये द्यावी, अशी मागणी दगडूशेठ हलवाई ट्रस्टतर्फे राज्य सरकारला करण्यात आली आहे.
राज्यातील मंदिरे सुरू करा, अशी मागणी दगडूशेठ हलवाई ट्रस्टने राज्य सरकारला केली. तसेच सुरुवातीला पहिल्या टप्प्यात केवळ मंदिरामध्ये भाविकांना दर्शनासाठी परवानगी द्यावी. दुसऱ्या टप्प्यात हार, फुले, नारळ यांची देवाण-घेवाण होईल, अशी व्यवस्था असावी आणि तिसऱ्या टप्प्यात भाविकांना मंदिरात बसण्याची परवानगी असावी, अशा प्रकारे मंदिर उघडण्याची प्रक्रिया व्हावी. मंदिर उघडताना काय आचारसंहिता असावी, याची पुस्तिका तयार आहे. त्याप्रमाणे देवस्थाने यंत्रणा राबवितील. या माध्यमातून कोरोनाला रोखता येईल व उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करता येईल, असे ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे व कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितले.
कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी संकष्टी चतुर्थीनिमित्त महागणेश याग कोरोनाचे संपूर्ण जगावर आलेले संकट दूर व्हावे आणि प्रत्येकाचे आरोग्य उत्तम रहावे, याकरीता येथील श्रीमंत दगडूशेठ गणपतीसमोर सहस्त्रधारा अभिषेक आणि सहस्त्रदुर्वाचन करण्यात आले. तसेच ॠग्वेद, यर्जुवेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांच्या संहिता पारायणासह महागणेश याग देखील पार पडला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे हा महागणेश याग पडला. सलग 15 दिवस चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमांमधून कोरोनाचे संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना करण्यात आली.
सध्या मंदिर बंद असल्याने ट्रस्टच्या वेबसाईट, अॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth _ Android_App या लिंकवरुन भक्तांना सहभागी होता होईल. तरी भाविकांनी ऑनलाइन सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.