पुणे - पिंपरी चिंचवडमध्ये हॉटेलच्या गेटवर लघुशंका केल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एका तरुणाचे अपहरण करून हत्या केल्याची घटना मंगळवारी समोर आली. हितेश गोवर्धन मूलचंदानी असे मृत तरुणाचे नाव असून कोयत्याने खून करण्यात आला होता. घटनेचे पडसाद म्हणून आज (बुधवारी) पिंपरी बाजार पेठ बंद ठेवण्यात आली.
लघुशंका वादावरुन एकाची हत्या. सिंधी समाजाच्यावतीने आंदोलन आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी करण्यासाठी शेकडोच्या संख्येने नागरिक हातात फलक घेऊन रस्त्यावर उतरले होते. आरोपीला पकडून फाशीची शिक्षा द्यावी, अशा आशयाचे फलक संतापलेल्या नागरिकांच्या हातात होते. पिंपरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी रोहित किशोर सुखेना यांनी फिर्याद दिली आहे. अमीन फिरोज खान, शाहबाज सिराज कुरेशी, आरबाज शेख, अक्षय संजय भोसले, लंगडा यांच्यावर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मंगळवारी पहाटे अमीन खानने हॉटलेच्या गेटजवळ लघु शंका केली. त्यावेळी कामगार साहिल ललवाणी याने 'लघुशंका करू नका?' असे सांगितले, या गोष्टीचा मनात राग धरून अमीनने त्या कामगाराला शिवीगाळ केली. यावेळी दुसरा कामगार कैलास पाटीलमध्ये येताच त्याच्या डोक्यात बिअर बॉटल फोडून जखमी केले. हे पाहून हॉटेलमधील कर्मचारी आणि मालक बाहेर आले. अमीनला पकडले तर त्यासोबत असलेला एक जण पळून गेला. काही जणांनी चारचाकीसह धूम ठोकली. पळत गेलेल्या आरोपीच्या पाठीमागे हितेश मुलचंदानी हा धावत गेला. तेव्हा, संबंधित आरोपींनी त्याचे अपहरण करून त्याच्यावर कोयत्याने वार करून खून केला.
याप्रकरणी एका आरोपीला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर चार जण फरार आहेत. घटनेचा अधिक तपास गुन्हे पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे करत आहेत.