पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरात पोलीस उपनिरीक्षकाने ५५ वर्षाच्या व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित घटनेची सत्यता पडताळून चौकशी करणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी सांगितले. पीडित व्यक्ती गेल्या दहा वर्षांपासून पोलीस मित्र आहेत. अरुण गोसावी असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून पोलीस उपनिरीक्षक सचिन उबाळेंसह इतरांनी मारहाण केल्याचा त्यांनी आरोप केलाय.
पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरात पोलीस उपनिरीक्षकाने ५५ वर्षाच्या व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लॉकडाऊनची घोषणा झाल्यापासून पोलीस कर्मचारी आणि अधिकारी दिवसरात्र कर्तव्य बजावत आहेत. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, काही पोलीस कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस दलाला मान खाली घालावी लागतेय. असाच प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये समोर आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
काय आहे प्रकार ?
मारहाण झालेल्या गोसावी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना, रविवारी माझ्या मुलीने पिझ्झा मागवल्याचे सांगितले. त्याचवेळी घरकुल परिसरात पोलीस बंदोबस्त असल्याने 'डिलीव्हरी बॉय'ला आत येण्यास परवानगी नव्हती. मी स्वतः गेटवर आलो, त्यावेळी पोलीस मित्र असलेल्या दोन तरुणांशी किरकोळ वाद झाला. यानंतर पिझ्झा घेऊन घरी गेलो. परंतु, रात्री नऊच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक सचिन उबाळे त्यांच्या एका कर्मचाऱ्यासोबत आले. गेटवर जाण्याचं कारण सांगून त्यांना घरातून बाहेर नेण्यात आले. यानंतर गेटवर आणताच सर्वांनी काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, असे गोसावी म्हणाले. तसेच अन्य व्यक्तींनी देखील मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केलाय.