पुणे -देशात अराजकता माजेल अशी स्थिती आहे. या परिस्थितीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भारतीय जनता पक्ष कारणीभूत आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. म्हणून केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात 24 जानेवारीला राज्यात बंद पुकारण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, सध्या देशात लोकशाही नाही तर हिटलरशाही दिसत आहे. नागरिकत्व दुरूस्ती कायद्यासंदर्भात येत असलेल्या बातम्यांमधून हा दहशतवाद निर्माण झाला आहे. राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी), नागरिकत्व दुरूस्ती विधेयक (सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीच्या (एनपीआर) माध्यमातून असंवैधानिक आणि आरएसएसला अपेक्षित काम सरकारकडून सुरू आहे.
हेही वाचा -'देशातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता समुपदेशन करण्याची गरज'
सध्या देशाची अर्थव्यवस्था ठप्प आहे. देश चालवण्यासाठी सरकारकडे पैसा नाही. 3 लक्ष कोटींची तूट आहे. हे सरकार दारुड्यासारखे सरकार आहे. केंद्र सरकारकडून एक-एक गोष्ट विकायला काढण्यात आली आहे, अशी टीका करत 9 हजार कोटींची नफा देणारी भारत पेट्रोलियम कंपनीला सरकारने विकायला काढली. याप्रकारे सरकार सोन्याचे अंड देणारी कोंबडी कापायला निघाले आहे. म्हणून या सगळ्या विरोधात येत्या 24 जानेवारीला 'महाराष्ट्र बंद' पुकारण्यात आला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.