पुणे - अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. यावर अजित पवार यांनी वारंवार प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, तरीही अनेकवेळा त्यांना याबाबत विचारले जाते. तुम्हाला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारला होता. त्यावर 'आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का?' अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांना दिली .
मोदींसारखा दुसरा नेता नाही - देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक केले होते. यावर अजित पवार म्हणाले की, आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी तसेच परिसराचा कायापालट करण्यासाठी आणि लोकप्रतिनिधींच्या कामासाठी मी शिंदे-फडणवीस सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे मत असू शकतात. नरेंद्र मोदींसारखा मजबूत नेता देशपातळीवर नाही आणि दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही असे माझे मत आहे.
नाना पटोलेंना मुख्यमंत्री होण्याची इच्छा - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. याबाबत अजित पवार यांना विचारला असता ते म्हणाले की, याबाबत त्यांना शुभेच्छा आहेत. प्रत्येकाचीच इच्छा होत असते की मुख्यमंत्री व्हावे आणि तशीच इच्छा नाना पटोले यांना झाली आहे असे वाटते. तसेच अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? असाच प्रश्न त्यांना विचारला होता. तर ते म्हणाले की, आतापर्यंत पन्नास वेळा सांगितले आहे याबाबत तर आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का?