पुणे (महाबळेश्वर) - राज्यावरील कोरोना संकट टळले, असे वाटत असतानाच चिंता वाढवणारी अजून एक बातमी समोर आली आहे. महाबळेश्वरमधील एका गुहेत सापडलेल्या वटवाघुळामध्ये निपाह विषाणू आढळला आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात महाबळेश्वरमधील एका गुहेत हे वटवाघूळ सापडले होते. त्यानंतर शास्त्रज्ञांनी या वटवाघूळांचे नमुने घेत अभ्यास केला होता. त्यातून ही माहिती समोर आली आहे.
निपाह रोगांच्या यादीत पहिल्या दहा मध्ये
या अभ्यासक्रमाच्या प्रमुख असणाऱ्या डॉ. प्रज्ञा यादव यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, यापूर्वी महाराष्ट्रातील वटवाघुळामध्ये अशा प्रकारचे कोणतेही विषाणू आढळले नव्हते. त्यामुळे निपाह विषाणू जर माणसांपर्यंत पोहोचला तर मोठ्या प्रमाणात जीवित हानी होण्याची शक्यता असते. निपाह व्हायरसला जागतिक आरोग्य संघटनेने रोगांच्या यादीत पहिल्या दहा मध्ये ठेवले आहे. एनआयव्हीने नुकतीच त्यांच्या अभ्यासक्रमात आलेली माहिती प्रसिद्ध केली आहे.