महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना काळात विनायक मेटेंनी मोर्चे न काढता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी - उदय सामंत

'कोरोना काळात विनायक मेटे यांनी मोर्चे न काढता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी. त्यांच्या काय मागण्या आहेत ते सांगावे. चर्चेतून मार्ग निघेल', असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. दरम्यान, उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक राज्यातील सर्वच महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

pune
पुणे

By

Published : Jun 5, 2021, 9:17 PM IST

पुणे - 'मराठा आरक्षणाबाबत जी समिती नेमण्यात आली होती, त्यांच्या शिफारशीनुसार सरकार काम करत आहे. सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे विनायक मेटेंनाही विनंती आहे, की कोरोना काळ सुरू आहे. त्यांनी मोर्चे न काढता मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करावी. त्यांच्या काय मागण्या आहेत ते सांगावे', असा सल्ला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे उदय सामंत यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

सर्वच महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा होणार

'उद्या (6 जून) छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन आहे. यानिमित्ताने हा दिवस उच्च व तंत्रज्ञान विभागाच्यावतीने शिवस्वराज्य दिन म्हणून घोषित केला आहे. त्याचा शुभारंभ उद्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे होणार आहे. कोरोनाच्या सर्वच नियमांचे पालन करून हा शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गेल्या कित्येक वर्षांपासून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून घोषित व्हावा, अशी सर्वांची इच्छा होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वच महाविद्यालयात, विशेष म्हणजे प्रत्येक खासगी महाविद्यालयातही प्रथमच शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येणार आहे. फक्त यावर्षी कोरोनाचे नियम पाळून हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक महाविद्यालयाने शिवज्योत रॅली काढावी, असे आदेशही महाविद्यालयांना देण्यात आले आहेत', अशी माहिती यावेळी सामंत यांनी दिली.

नारायण राणेंना टोला

'मराठा समाजाबरोबर मी नेहेमी आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेहेमी सांगितले आहे. कालसुद्धा पुनर्विचार याचिकेबाबत बैठक झाली आहे. काही लोक कदाचित गैरसमज निर्माण करीत असतील. उद्धव ठाकरे हे नेहेमी मराठा समाजाबरोबर राहिले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मताचे स्वतः उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे काही लोक गैरसमज निर्माण करत आहेत. त्यांचे किती लोक ऐकतात माहिती नाही', असे म्हणत नाव न घेता सामंतांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना यांना टोला लगावला आहे.

सध्यातरी ऑनलाईनच शिक्षण

'कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून ऑनलाईन शाळा, महाविद्यालय सुरू आहे. अनेक परीक्षा, टेस्टही ऑनलाईनच घेण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे कोरोनामुळे दहावी, बारावीची परीक्षा देखील रद्द करण्यात आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विचार करता सध्या तरी ऑनलाईनच शिक्षण सुरू असणार आहे', असेही सामंतांनी म्हटले आहे.

हेही वाचा -कोरोनामुळे पालकांचे छत्र हरवलेल्या सार्थकची यशोमती ठाकूर यांनी केली विचारपूस

ABOUT THE AUTHOR

...view details