पुणे- शिरुर तालुक्याच्या दोन्ही बाजूने भीमा नदी व घोड नदी या दोन मोठ्या नद्या वाहतात. असे असतानाही शिरुर तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळी संकट ओढावत आहे. हा दुष्काळ चासकमान व डिंबा धरणातील पाणी वाटपाचे नियोजन व्यवस्थित न झाल्याने ओढावला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अशोक पवार यांनी केला. पाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मांडगणफराटा येथे भीमा नदी पात्रात आंदोलन करण्यात येत आहे. त्याप्रंसगी पवार बोलत होते.
'चासकमान आणि डिंबा धरणातील पाणी वाटपाचे नियोजन न झाल्यानेच शिरुर तालुक्यात दुष्काळ'
शिरुर तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळी संकट ओढावत आहे. हा दुष्काळ चासकमान व डिंबा धरणातील पाणी वाटपाचे नियोजन व्यवस्थित न झाल्याने ओढावला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अशोक पवार यांनी केला. पाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मांडगणफराटा येथे भीमा नदी पात्रात आंदोलन करण्यात येत आहे.
भीमा नदी, घोडनदी या दोन्ही नद्यांची पात्रे कोरडी पडली आहेत. या दोन्ही नद्यांवर उभ्या असलेल्या जलाशयांनी तळ गाठला आहे. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट नागरिकांसमोर उभे राहिले आहे. पावसाळ्यात चासकमान व डिंबा ही दोन्ही धरणे शंभर टक्के भरली होती. मात्र, पाणी वाटपाचे नियोजन व्यवस्थित न करता पाण्याचे वाटप करण्यात आले.
गरज नसतानाही नको त्यावेळी कालव्यांमधून व नदी पात्रातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे. पाण्याचे व्यवस्थित नियोजन करण्यात यावे, तसेच पाणीपुरवठा व्यवस्थितरित्या करण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नदीपात्रातच आंदोलन करण्यात आले.