पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन आज करण्यात आले. परंतु विरोधकांना बोलावले नाही आणि त्या ठिकाणी पूजा केल्याने चहू बाजूने भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीका होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यावर टीका केली आहे. या कार्यक्रमात आपण न गेल्याचे समाधान वाटत आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. ते पुण्यात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
हे सगळ उलटं चालू आहे :मी सकाळी दीड तास हा कार्यक्रम पाहिला त्याच स्वरूप बघून आपण गेलो नाही याचे मला जास्त समाधान वाटत आहे. त्या ठिकाणी जे लोक होते जे काही अभिषेक उपासना चालू होती त्यावरून आधुनिक भारताची संकल्पना ही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडली. ही संकल्पना आणि आता जे चालू आहे यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पुन्हा एकदा आपण देशाला काही वर्ष पाठीमागे नेते आहोत का अशी चिंता आता वाटायला लागली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी देशाची तडजोड करता येत नाही. जवाहरलाल नेहरूने आधुनिक विज्ञानाची देशाच्या विकासासोबत सांगड घातली. त्याच्या उलट हे सगळं चालू आहे.
कार्यक्रमाला न जाण्याचे दुसरे कारण : या कार्यक्रमाला गेलो नाही याचे दुसरे कारण म्हणजे संसदेचे कुठलेही काम हे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या हस्ते सुरू होते. मग ते अधिवेशन असो की इतर काही कार्यक्रम त्यांना बोलावले जाते. परंतु त्यांना कार्यक्रमाला बोलवले नाही. पण त्यांचा संदेश वाचून दाखवला जाणार आहे. लोकसभेचे अध्यक्ष त्या ठिकाणी आहेत पण राज्यसभेचे अध्यक्ष नाहीत. त्या ठिकाणी राज्यसभेचे उपराष्ट्रपती अध्यक्ष असतात ते सुद्धा उपस्थित नाहीत. त्यांनाही बोलावले गेले नाही. तेच साधुसंत बोलवले हा कार्यक्रम मर्यादित घटकासाठीच होता का असाही प्रश्न आहे.