पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यातील कात्रज चौक येथे उभारण्यात येणाऱ्या कामाची पाहणी केली. काल झालेल्या मोर्चाबाबत सुळे यांना यावेळी विचारले असता त्या म्हणाल्या की जेव्हापासून भाजपचे सरकार आले आहे. तेव्हापासून मला अरुण जेटली यांची आठवण येते. ते नेहेमी म्हणायचे की समाजात जेव्हा ज्या काही चुकीच्या गोष्टी होतात तेव्हा तुम्ही दाखवणे बंद करा म्हणजे हे वागणे बंद करतील. त्यामुळे अनेकवेळा मला भाजपला सुषमाजी आणि अरुणजी यांचीच आठवण करून द्यावी लागते.
जयंतीनिमित्त जे काही राजकारण होत आहे ते दुर्दैवी : आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून यावेळी सुळे म्हणाल्या की मी मनापासून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते. ठाकरे आणि पवार कुटुंबीयांचे पाच दशकापासून ऋणानुबंधाचे संबंध आहेत. आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जे काही राजकारण होत आहे ते दुर्दैवी आहे. बाळासाहेबांना ते आवडणार नाही. बाळासाहेब हयात असताना त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी उद्धव ठाकरे यांना निवडले असताना देखील आज शिवसेना तोडण्याचा फोडण्याचा आणि त्रास देण्याचे काम होत आहे. याचा अर्थ असा की तुम्ही बाळासाहेबांच्या निर्णयाला विरोध करत आहात,असे यावेळी सुळे म्हणाल्या.