महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आता जर घोषणेचा आवाज आला ना, तिकिटच कापतो - अजित पवार

शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विलास लांडेच पाहिजेत, ‘आमचा उमेदवार विलास लांडेच’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. त्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आक्रमक झाले.

By

Published : Mar 6, 2019, 10:23 AM IST

अजित पवार1

पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विलास लांडेच पाहिजेत, ‘आमचा उमेदवार विलास लांडेच’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. त्यावर आक्रमक झालेल्या अजित पवारांनी, आज बेंबीच्या देठापासून ओरडता २००९ च्या लोकसभा निवडणुकी वेळी कुठे गेला होता? असा सवाल विचारत आता घोषणा दिल्या तर, तिकीटच कापतो, मला अजित पवार म्हणतात, असा सज्जड दम त्यांनी विलास लांडे यांच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना दिला. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.

पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी भोसरीतील 'गावजत्रा मैदान' येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, डॉ. अमोल कोल्हे, देवदत्त निकम, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, अतुल बेनके, महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, अपर्णा डोके, वैशाली घोडेकर, मोहिनी लांडे आदी उपस्थित होते.

मेळाव्यात अजित पवार यांचे भाषण सुरु असताना कार्यकर्त्यांनी विलास लांडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे अजित पवारांच्या भाषणात अडसर निर्माण होत होता. त्यामुळे भाषण थांबवत, आज बेंबीच्या देठापासून ओरडता, २००९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी कुठे गेल होता? जरा सबुरीने घ्या.

उमेदवारीबाबत पवार साहेब निर्णय घेतील. तुमचा सांगावा साहेबांना सांगतो. त्यामुळे आता आवाज येऊ देऊ नका. घोषणेचा आवाज आलाच तर, तिकीटच कापतो, मला अजित पवार म्हणतात, असा सज्जड दम त्यांनी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना दिला. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूरमध्ये विलास लांडे यांनी तयारी सुरू केली आहे. त्यांनी विविध दौरेही केले आहेत. त्यांचे समर्थक कामाला लागले असताना येथील जागा अमोल कोल्हेंना मिळण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने लांडे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details