पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हत्येचा कट केला जात असल्याची तक्रार पुण्यातील शिवाजीनगर पोलिसात देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांनी ही तक्रार पोलिसात दिली आहे. शरद पवार यांच्या हत्येच्या कटाची तसेच महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकण्याचे कारस्थान असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकाराचा तातडीने तपास करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया हेही वाचा - 'जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठीच सीएए कायदा'
हेही वाचा -सारखे सांगून समजत नसेल तर धडा शिकवावा लागतो, पवारांचा भाजपला टोला
गेले काही महिने समाज माध्यमावर टोकाच्या विद्वेषाची भावना पसरवणे, तसेच जातीय तणाव निर्माण करून महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय ऐक्याला तडा जाईल असे अनेक पोस्टर सोशल मीडियावर पाहात आहे. विधानसभा निवडणुकीचे राजकारण थांबल्यावर हे कमी होईल, असे वाटल्याने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर भाऊ तोरसेकर, घनश्याम पाटील आणि इतर लोक सातत्याने समाज माध्यमाद्वारे पोस्टमन, थिंक टँक या चॅनलद्वारे टाकण्यात आलेल्या व्हिडीओवरील भाषणे पाहिली तर तरुणांमध्ये आणि समाजामध्ये शरद पवारांना संपवीले पाहिजे, अशी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचे निदर्शनास आल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन याचा सखोल तपास करावा. तसेच या कारस्थानाच्या सूत्रांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांनी ही तक्रार सायबर सेलकडे अधिक तपासासाठी दिली आहे.