पुणे :कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या जागांवर केंद्रीय निवडणुक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. येत्या २७ फेब्रुवारी २०२३ रोजी या दोन्ही जागांसाठी मतदान प्रकिया पार पडणार आहे. तर, २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.
मोर्चेबांधणीला सुरुवात - पुण्यातील कसबा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षातील इच्छुक उमेदवारांनी देखील मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. कसबा मतदार संघातून काँग्रेस निवडणूक लढवत असल्याने महाविकास आघाडी काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
कसब्यातील बाजी कोण मारणार? -दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या विरोधात काँग्रेसचे अरविंद शिंदे, मनसेकडून अजय शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. आत्ता कसब्यातील जागा ही राष्ट्रवादीकडे जाणार की काँग्रेसकडे हे पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नाना काटे आज उमेदवारी अर्ज भरणार आहे. काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला असल्याचे सांगितले जात आहे. भाजपकडून हेमंत रासने यांनी अर्ज भरला. कसब्यातील बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, या निवडणूकीत अटीतटीची लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.