महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sharad Pawar on Riots: दंगलींमधून जाणिवपूर्वक वादविवाद वाढवायचा प्रयत्न- शरद पवार - शरद पवार

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गुरूवारी बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रात होणाऱ्या दंगलींबाबत त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे.

Nationalist Congress President Sharad Pawar
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

By

Published : Jun 9, 2023, 7:37 AM IST

पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार

पुणे :राज्यात कोल्हापूरसह अन्य काही दोन, तीन ठिकाणी ज्या दंगली घडलेल्या आहेत, त्या महाराष्ट्राच्या लौकीकाला शोभणाऱ्या नाहीत. महाराष्ट्र हे संयमी, शांतताप्रिय राज्य आहे. येथील सर्वसामान्य लोकांची कायदा हातात घेण्याच्या संबंधीची प्रवृत्ती नाही. कोणीतरी काहीतरी प्रश्नातून जाणीवपूर्वक वादविवाद वाढवायचा प्रयत्न करत असेल, त्यांना माझे आवाहन आहे की याची किंमत सामान्य माणसालाच भोगावी लागते. सामान्य माणसाच्या हितासाठी असे प्रकार घडणार नाही, याची काळजी घ्या असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले.


राज्यात घडलेल्या प्रकारानंतर शासकीय यंत्रणा किंवा पोलिस यंत्रणा जी काही पावले टाकत आहेत, त्या यंत्रणेला सर्वसामान्यांनी मनापासून सहकार्य करण्याची गरज आहे. - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार



सामाजिक परिवर्तनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी :पुढे बोलताना पवार म्हणाले की, आपण सगळ्यांनी यंत्रणेला सहकार्य केले तर हे प्रकार तातडीने बंद झाल्याचे आपल्याला दिसून येईल. कोल्हापूर शहर असो की अन्य शहरे असो. या सगळ्या शहरांची सामाजिक परिवर्तनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. तेथे शांतता निर्माण केली पाहिजे. सामान्य माणसाच्या हिताची जपणूक छत्रपती शाहू महाराज व महाराणी ताराराणी यांचा आदर्श ठेवून केली पाहिजे. कोणी चुकीचे वागत असेल पण बहुसंख्य समाजाने संयमाची भूमिका घेतल्यानंतर राज्य शासनाने त्यामध्ये सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे, मग ही स्थिती बदलेल. शांतता प्रस्थापित होईल.


नितीशकुमारांच्या निमंत्रणानुसार बिहारला जाणार :बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा मला फोन आला होता. ते त्यांच्या राज्यामध्ये देशातील विरोधी पक्षांच्या प्रमुखांची बैठक बोलवत आहेत. मला त्यांनी निमंत्रित केले. मी जाणार आहे. यानिमित्ताने देशापुढील प्रश्नावर एकत्र येवून भूमिका घेण्याची आवश्यकता दिसते. ती घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांना एकत्र यावेच लागेल. सरकारच्या सोबत सामुहिक भूमिका मांडावीच लागेल. त्यासाठी हा प्रयत्न आहे. त्याला माझा व सहकारी मित्रांचा पूर्ण पाठींबा आहे.



राज्य सरकारकडून अंमलबजावणी नाही :राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीनंतर जाहीर केलेल्या धोरणांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. काल मविदर्भातील एका जिल्ह्यात मला एक गोष्ट ऐकायला मिळाली, मागील अतिवृष्टी आणि गारपीटीने झालेल्या नुकसानीसाठी जाहीर झालेली मदत अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही. ही गोष्ट चांगली नाही. शेवटी शेतकरी आयुष्यभर काळ्या आईचे इमान राखतो. लोकांच्या भूकेचा प्रश्न सोडवतो. त्याच्या संकटाच्या काळात या बळीराजाला शासनाने मदत केलीच पाहिजे. तो आग्रह त्यांचा आहे. तो काही चुकीचा नाही. त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न माझ्यासारखे लोक सुद्धा करतील असे पवार म्हणाले.


नामांतरणाच्या निर्णयाबाबत वाद नको :बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले आहे. यासंबंधीचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. तो कसा, का केला यावर चर्चा होवू शकते. परंतु एकदा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यात वाद नको, ही भूमिका सगळे मिळून घेवू. जो निर्णय घेतला असेल त्याची अंमलबजावणी करू, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

  1. NCP Silver Jubilee Anniversary : राष्ट्रवादीचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन, पक्षाची राष्ट्रीय कामगिरी ते राज्य पातळीवर घसरण...
  2. Sharad Pawar on Politics : जनतेने इंदिरा गांधी सारख्या जबरदस्त नेत्यांचाही पराभव केला होता - शरद पवार
  3. Maharashtra Politics: औरंगाबाद शहराच्या नामांतरणाबाबत महाविकास आघाडीत मतभेद, पहा दोन्ही नेते काय म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details