पुणे -राष्ट्रीय महामार्ग हे देशाच्या प्रगतीची चिन्हे आहेत, देशातील महानगरे ही राष्ट्रीय महामार्गाने जोडल्याने तेथील विकास हा झपाट्याने होत असतो. देशातील महत्त्वाच्या महानगरांपैकी एक असलेल्या पुणे शहराला जोडणारे राष्ट्रीय महामार्ग कुठले आणि त्यांची सद्यस्थिती काय यावर टाकलेला हा दृष्टीक्षेप....
देशात ६६, ५९० कि. मी.चे महामार्ग
भारताच्या दळणवळण क्षेत्राला बळकटी देण्याचे काम महामार्गाच्या माध्यमातून होत असते, त्यात राष्ट्रीय महामार्ग हे देशाचे मुख्य रस्ते. भारताचा विचार केला तर संपूर्ण देशात राष्ट्रीय महामार्गांचे ६६ हजार ५९० कि. मी.चे जाळे पसरले आहे. भारतातील या महामार्गाच्या बांधणी आणि देखभालीसाठी १९९५साली महामार्ग रस्ते विकास प्राधिकरण संस्थेची स्थापना करण्यात आली होती. भारतातील एकूण रस्त्यांच्या फक्त २ टक्के रस्ते हे राष्ट्रीय महामार्ग आहेत, मात्र एकूण रस्ता वाहतुकीच्या ४० टक्के वाहतूक या मार्गावरून होते हे विशेष....
पुणे ३ राष्ट्रीय महामार्गाने जोडलेले शहर
पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे शहर आणि जिल्हा हा तीन राष्ट्रीय महामार्गांनी जोडलेला आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ आणि पुणे नाशिक महामार्ग क्रमांक ५० असे तीन राष्ट्रीय महामार्ग आहेत. राष्ट्रीय महामार्ग ४ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे, १ हजार २३५ कि. मी. धावणारा हा महामार्ग मुंबई आणि चेन्नई या दोन महानगरांना जोडतो. पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, चित्रदुर्ग व बंगळूर ही रा. म. ४वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. ४हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा एक भाग आहे.
देशातील पहिला एक्स्प्रेस वे असलेला राष्ट्रीय महामार्ग
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा भारतातील पहिला द्रुतगती मार्ग हा रा. म. ४चा एक भाग आहे. हा महामार्ग महाराष्ट्रात ३७१ किमी, कर्नाटकमधून ६५८ किमी आणि आंध्र प्रदेश ८३ किमी तर तामिळनाडूमधून १३३ किमी जातो.
पुणे परिसरातील राष्ट्रीय महामार्गाची रखडलेली कामे
पुणे परिसराचा विचार केला तर या भागातून जाणाऱ्या या महामार्गाच्या दुरुस्तीचे, बांधणीचे काम हे अनेक वर्षे सुरूच असून टोलच्या माध्यमातून वाहनधारकांना मोठा भुर्दंड बसत असल्याचे तसेच रस्त्याच्या कामामुळे स्थानिक नागरिकांना येणाऱ्या अडचणी अनेक असल्याचे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर सांगतात.
एका राज्यातील शहरांना जोडणारा एकमेव राष्ट्रीय महामार्ग
राष्ट्रीय महामार्ग ४ सोबतच पुणे ते नाशिक हा १९२ किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग हा भारतातील एकाच राज्यातील शहरांना जोडणारा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे. या मार्गावर सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, राजगुरूनगर, चाकण ही इतर शहरे येतात. पुणे शहरातून जाणारा तिसरा महामार्ग म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५, पुणे, इंदापूर, सोलापूर, उमरगा ते कर्नाटक सीमेपर्यंत या महामार्गाचे ३३६ किलोमीटर अंतर आहे. तर पुढे मच्छलीपट्टणम या शहराला हा महामार्ग जोडतो. हा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून जातो. हा राष्ट्रीय महामार्ग ८५१.६६ किमी अंतराचा आहे. पुणे, सोलापूर, हैदराबाद, विजयवाडा, मच्छलीपट्टणम ही महत्त्वाची शहरे या मार्गावर येतात.
अशा या तीन राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून पुणे शहर हे देशाच्या इतर प्रमुख महानगरांशी जोडले गेलेले आहे. मात्र या राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी लागणारा कालावधी हा प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारा असल्याने विकासाचे हे मार्ग अडचणीचे आगार बनू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.