पुणे- कोरोना आजाराच्या तपासणीत घोळ होत असल्याच्या शक्यतेने पुण्यातील खासगी पॅथॅलॉजी प्रयोगशाळा आता पुणे महापालिकेच्या रडारवर आल्या आहेत. महापालिकेच्या पाहणीनुसार सरकारी आणि खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत तफावत आढळून येत आहे. सरकारीपेक्षा खासगी प्रयोगशाळांमध्ये पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण जास्त असून हे प्रमाण १५ टक्के जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाने या खासगी प्रयोगशाळांची पडताळणी करण्याचे ठरवले आहे. या प्रयोगशाळा कुठल्या पद्धतीने चाचणी करतात, पॉझिटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण जास्त का आहे? याची तपासणी केली जाणार आहे.
पुण्यातील कोरोना आटोक्यात येईना; खासगी प्रयोगशाळा महापालिकेच्या रडारवर..! - पुण्यातील खासगी प्रयोगशाळांची तपासणी महापालिका करणार
सरकारीपेक्षा खासगी प्रयोगशाळांमध्ये पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण जास्त असून हे प्रमाण १५ टक्के जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाने या खासगी प्रयोगशाळांची पडताळणी करण्याचे ठरवले आहे. या प्रयोगशाळा कुठल्या पद्धतीने चाचणी करतात, पॉझिटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण जास्त का आहे? याची तपासणी केली जाणार आहे.
खासगी प्रयोगशाळांमध्ये दररोज सुमारे अकरा हजार चाचण्या घेतल्या जातात. त्या तुलनेत सरकारी प्रयोगशाळांमध्ये सुमारे तीन हजार चाचण्या घेतल्या जातात. पुणे महापालिकेच्या आकडेवारीनुसार सरकारी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांच्या पॉझिटिव्ह अहवालाची टक्केवारी सुमारे 25 टक्के आहे, तर खासगी प्रयोगशाळांमध्ये ही टक्केवारी सुमारे 40 टक्के आहे. पुणे शहरात एकूण 26 मोठी चाचणी केंद्रे कार्यरत आहेत. त्यात 24 खासगी प्रयोगशाळांचा समावेश आहे. यात एनआयव्ही आणि ससून रुग्णालय या सरकारी प्रयोगशाळांचा समावेश आहे. मात्र, सरसकट खासगी प्रयोगशाळांवर बंदी घालणे हा पर्याय नाही. परंतु, तक्रारींमधील प्रकरणांची सत्यता लक्षात घेऊन संबंधितांवर कारवाई केली जाऊ शकते, असे संकेत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. पुणे महापालिका क्षेत्रात दररोज सरासरी सुमारे 14,000 चाचण्या घेतल्या जातात.
होळी आणि रंगपंचमीवर निर्बंध..
दरम्यान, पुणे शहरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शहरात होळी आणि धुलीवंदन, रंगपंचमी हे सण खासगी तसेच सार्वजनिकरित्या साजरे करण्यास मनाई करण्यात आली असून या संदर्भात महापालिका आयुक्तांनी आदेश काढले आहेत. शहरातील विविध कार्यक्रम, सणांवर बंधने असताना पुणे शहरात वाढणाऱ्या नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. बुधवारी २४ मार्चला दिवसभरात शहरात ३५०९ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात १४१० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, आज ३३ रुग्णांचा मृत्यू झाला असून ९ रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. तर सध्या शहरात ५८९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.