पुणे : एमपीएससीची विद्यार्थी 48 तासापासून पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये उपोषणाला बसले होते. यामध्ये उपोषण करणाऱ्यांची तब्येत सुद्धा खालावली होती. परंतु सरकारकडून आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही, अशी मागणी या विद्यार्थ्यांची होती. रात्री उशिरापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी या ठिकाणी भेट दिली. परंतु विद्यार्थ्यांमध्ये काही तोडगा निघत नव्हता. प्रशासन सुद्धा हे आंदोलन संपवण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांकडून प्रयत्न चालू होता, परंतु कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांची गर्दी वाढत होती. विद्यार्थ्यांचा पाठिंबा वाढत होता, त्यामुळे प्रशासन सुद्धा हतबल झाले होते. अनेक नेत्यांचा या ठिकाणी असलेला सहभाग पाहता आंदोलन तीव्र होणार असे दिसत होते.
पवारांनी साधला मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद : रात्री शरद पवार हे बारामतीवरून घरी येत असतानाच त्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येणार असल्याचे जाहीर केले. विद्यार्थी आणखी आक्रमक झाले, परंतु शरद पवार आल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात यावे, अशी विनंती त्यांनी आंदोलकांना केली. आंदोलक विद्यार्थ्यांनी ती मागणी मान्य केली. जवळपास साडेदहा पावणे अकराच्या दरम्यान शरद पवार हे आंदोलन स्थळी आले. त्यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोनवरून संवाद साधला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये एमपीएससी आयोगासोबत मुख्यमंत्री स्वतः, आयोगाचे काही अधिकारी येतील असे शरद पवार यांनी सांगितले. तुमच्यामधून कुठलेही पाच प्रतिनिधी पाठवा आणि त्यांच्यासोबत चर्चा करायला आयोग तयार आहे. त्यामुळे हे आंदोलन तूर्तास तुम्ही मागे घ्या, असे आवाहन शरद पवार यांनी केल्यानंतर आंदोलकांनी हे मान्य केले.