पुणे - गणपतीची वर्गणी न दिल्याच्या रागातून दहा जणांच्या टोळक्याने आई आणि मुलांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सदर मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत. रमेश देवराम चौधरी (३७) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
गणपतीची वर्गणी न दिल्याच्या रागातून आईसह मुलांना बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद - वर्गणी
गणपतीची वर्गणी न दिल्याच्या रागातून दहा जणांच्या टोळक्याने आई आणि मुलांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसात गुन्हा दाखल झाला असून तक्रार नोंदवण्यात आली आहे.
आरोपी सागर घडसिंग आणि फिर्यादी हे एकाच कॉलनीत राहतात. तर फिर्यादी यांचे त्याच परिसरात माताजी कलेक्शन नावाचे कपड्याचे दुकान आहे. कॉलनीत ओम साई गणपती मंडळ असून त्याची ५ हजार वर्गणी का देत नाहीत, म्हणून मध्यरात्री आरोपी फिर्यादी यांच्या बंद दुकानाची जाळी जोरजोरात वाजवत होता. यावेळी फिर्यादी आणि त्याचा जखमी भाऊ मुकेश चौधरी, आई जमनीबाई चौधरी यांनी त्याला विरोध केला. यानंतर आरोपी सागरने १० जणांचे टोळके बोलावले. त्यांच्या हातात लाकडी दांडके होते. तर सागरच्या हातात लोखंडी पाईप होता.
तुम्ही आम्हाला वर्गणी का देत नाही? थांब तुला जीवे ठार मारतो, असे म्हणून आरोपीने लोखंडी पाईप फिर्यादी यांचा भाऊ मुकेशच्या डोक्यात मारला यात ते गंभीर जखमी झाले आहेत. तर इतर टोळक्याने लाकडी दांडक्याने फिर्यादी आणि त्याच्या आईला मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून यात त्या तिघांना बेदम मारहाण केल्याचे स्पष्ट दिसत आहे. या घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.