पुणे : भाजपा नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्वाती मोहळचा भाजपात प्रवेश झाल्याने पुण्यात मोठी चर्चा होत आहे. स्वतः या पक्षप्रवेशाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यांच्याच प्रमुख मार्गदर्शनाखाली हा प्रवेश झाल्याने पुण्यातील सगळ्या लोकांचा भुवया उंचावल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून भाजपामध्ये पुण्यातील अनेक गुन्हेगारांचा प्रवेश होत आहे. कसबा पोट निवडणुकीमध्ये शरद मोहोळ भाजप प्रचारात दिसला होता. भाजपा राजकारणाचे गुन्हेगारीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका सुद्धा विरोधक करत आहे.
हिंदुत्ववादी मतदानाची अपेक्षा :पुण्यात काही दिवसापूर्वी हिंदू आक्रोश मोर्चा निघाला होता. त्या हिंदू आक्रोश मोर्चाचे नेतृत्व शरद मोहोळ यांनी केले होते. त्यावेळी त्यांनी भाजपात येण्याची कुठलीही इच्छा, राजकीय आकांक्षा नाही, असे म्हटले होते. परंतु भाजपाने हिंदुत्ववादी मतदान होईल, आपल्याला या येणाऱ्या निवडणुकीत फायदा होईल. त्या दृष्टीने हा प्रवेश करून घेतलेला आहे. नुकतेच गिरीश बापट यांचे निधन झाल्याने पुण्याची लोकसभा सुद्धा आता लढावी लागणार आहे. त्यावेळी पराभव होऊ नये, यासाठी ही काळजी घेतली असल्याचे भाजपकडून बोलले जात आहे.
गुन्हेगाराच्या पत्नीला प्रवेश : दोन वर्षांपूर्वी स्वाती मोहोळ यांनी चंद्रकांत पाटील यांचा एका कार्यक्रमात सत्कार केला होता. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी गुंड आहे का? मला माहिती नाही, असे म्हणून हात झटकले होते. परंतु आता मात्र त्यांनी दणदणीत प्रवेश करून घेतलेला आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी हात झटकणारे चंद्रकांत पाटील अचानक प्रवेशास कसे तयार झाले? याची चर्चा आता पुण्यात होत आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा एका गुन्हेगाराच्या पत्नीला प्रवेश दिल्याने भाजपावर टीका होत आहे.