पुणे -राजधानी मुंबई वगळता राज्यात दरमहा सरासरी 7 ते 8 लाख मोबाईल विकले जातात. कोरोनामुळे ऑनलाइन पद्धतीने शाळा आणि क्लासेस सुरू झाले आहेत. त्यामुळे मे महिन्यापासूनच मोबाईलची मागणी वाढली होती. जूनमध्ये मुंबई वगळता राज्यात 15 लाख मोबाईलची विक्री झाल्याची, माहिती ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष अजित जगताप यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर हळूहळू सर्व काही सुरू होत गेले. कोरोनामुळे शाळाही ऑनलाइन माध्यमातून सुरू झाल्या. मात्र, यासाठी पालकांकडे पुरेशी व्यवस्था उपलब्ध नव्हती. मुलांचे शिक्षण तर महत्त्वाचे आहे म्हणून पालकांनी लॉकडाऊननंतर मुलांच्या शिक्षणासाठी मोबाईल खरेदी करण्यास सुरुवात केली. याचा फायदा मोबाईल विक्रेत्यांना झाला असून राज्यात एका महिन्यात सर्वाधिक 15 लाख मोबाईल विक्री झाली आहे.
लॉकडाऊनचा परिणाम -
लॉकडाऊन अगोदर एका महिन्याला मुंबई वगळता राज्यात 8 ते 10 लाख मोबाईलची विक्री होत होती. पण, लॉकडाऊननंतर ऑनलाइन शिक्षण जसे सुरू झाले तसे मोबाईल विक्रीच्या व्यवसायात तेजी येत गेली. जून, जुलै महिन्यात दिडपट व्यवसाय झाला असून महिन्याला 15 लाख मोबाईल मुंबई वगळता राज्यात विकले गेले. ऑगस्टनंतर या व्यवसायात पुन्हा घट झाली असून आता पुन्हा मोबाईल दुकानदारांना संघर्ष करावा लागत आहे. ऑनलाइन व्यवसायाचाही मोठ्या प्रमाणात फटका आम्हाला बसला आहे, अशी माहिती अजित जगताप यांनी दिली आहे.