पुणे MLA Rohit Pawar On Student Issue :सरकारी कर्मचारी भरती टाळून त्याजागी कंत्राटी भरती करण्याचं धोरण सरकारनं अवलंबलं आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. ते आक्रमक झाल्यावर त्यांना ट्रोल केलं जातंय. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल केला जातोय, ज्यामध्ये ते 'परीक्षा फी'च्या विषयात सरकार ऐकत नाही. त्यामुळं हा विषय थोडा पेटवत ठेवावा लागेल, त्याशिवाय सुटणार नाही असं ते म्हणत आहेत. (Rohit Pawar On issue Contractual recruitment)
युवकांच्या प्रश्नांसाठी आंदोलन :यावर रोहित पवार म्हणाले की, सरकार एक हजार रुपये गरीब मुलांकडून वसूल करतंय. याविषयी निवेदनं देऊनही सरकार झोपेचं सोंग घेत असेल, तर युवकांना त्यांच्या प्रश्नासाठी पेटवावं लागतंच. युवकांच्या प्रश्नांसाठी जर आंदोलन करून महाराष्ट्र पेटवावा लागत असेल, तर हो मी सकारात्मक दृष्टीने महाराष्ट्र पेटवत आहे, असं यावेळी रोहित पवार म्हणालेत. सरकारी भरतीत प्रचंड प्रमाणात गैरप्रकार होत आहेत. 'परीक्षा फी'च्या माध्यमातून सरकार विद्यार्थ्यांना लुबाडून आपली तिजोरी भरतंय. या याविरोधात आज आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली महात्मा ज्योतिबा फुले वाडा येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. (government employee recruitment)
युवा वर्गाच्या आयुष्याचा खेळ :पवार पुढे म्हणाले की, मी सकारात्मक दृष्टीनं विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र पेटवत आहे. आम्ही जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये तुमच्यासारखं तेढ निर्माण करत नाही. सरकारनं परीक्षा फीच्या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांची लुटमार करायची. पेपरफुटी होत असताना दुर्लक्ष करायचं, कंत्राटीकरणाला बळ द्यायचं, युवा वर्गाच्या आयुष्याचा खेळ मांडायचा. आता या विषयांवर सत्तेच्या मस्तीत बेधुंद असलेल्या सरकारला जाब विचारून विद्यार्थ्यांची भूमिका मांडणं, म्हणजे महाराष्ट्र पेटवणं असेल तर मी महाराष्ट्र पेटवतोय. तुम्हाला महाराष्ट्र पेटू द्यायचा नसेल, तर पेपरफुटी संदर्भात कायदा करा. गोरगरीब विद्यार्थ्यांकडून लुटलेली परीक्षा फी परत करा. तसंच कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करा, असं यावेळी रोहित पवार म्हणाले.
तीव्र आंदोलनाचा इशारा : आज लाक्षणिक उपोषण करण्यात येतंय. पण येणाऱ्या काळात जर सरकारनं विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही, तर पुढच्या महिन्यात राज्यभर तीव्र आंदोलन करू, असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय.
महिला आरक्षणाचा ठराव : संसदेत महिला आरक्षणाचा ठराव मांडला, याबाबत सर्वच जण स्वागत करत आहेत. पण विशेष म्हणजे महिला आरक्षणाची दिशा या राज्यानं दिलीय आणि आज ते देशभर होत आहे. हा ठराव आणला पण तो 2026 ला लागू करणार आहे. या महिला आरक्षणासाठी हे सरकार आता निवडणुका न घेता 2026 ला निवडणूक घेतील, असंही यावेळी रोहित पवार म्हणाले.
आरक्षण द्या : भाजपा आरक्षणाबाबत राजकरण करतंय. हे आरक्षण देखील केंद्रात अडकलंय. तुमचं ट्रिपल इंजिन सरकार आहे, मग आरक्षण आणा ना. दिल्लीत कुणीच आरक्षणाबाबत बोलत नाहीत. भाजपाचे लोक राज्यात एक आणि केंद्रात एक बोलत आहेत. कुठलीही भूमिका हे सरकार घेत नाही. तुमचं केंद्रातही सरकार आहे, तर मग ईडब्ल्यूएसचं आरक्षण द्या, असं देखील यावेळी रोहित पवार म्हणाले.