महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मावळमध्ये लक्ष्मण जगतापांचा पार्थ पवारांना पाठिंबा? बारणे-जगताप वाद पुन्हा उफाळला - maval loksabha

मावळची उमेदवारी शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना गेल्याने लक्ष्मण जगताप सध्या नाराज आहेत.

पार्थ पवार

By

Published : Mar 23, 2019, 1:57 PM IST

पुणे- तुकाराम बीज सोहळ्याच्या निमित्ताने विरोधी उमेदवार श्रीरंग बारणे यांची नुकतीच पार्थ पवारांनी भेट घेतली. त्यानंतर आज शनिवारी भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप व पार्थ पवारांची भेट झाली. शिवजयंतीनिमित्त पिंपळे गुरवमध्ये हे दोन्ही नेते एकत्र आले. आता सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र येणे यात काही विशेष नसले तरी, श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप यांच्यातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार आज प्रचारानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात आहेत. त्यात आज शिवजयंती असल्यामुळे त्यांनी शहरातील मंडळांच्या भेटी घेतल्या. पिंपळे गुरवमध्ये मंडळांच्या भेटीला ते गेले असताना त्याचवेळी भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप तेथे दाखल झाले. हे दोघेही एकाचवेळी आल्यामुळे उपस्थित मंडळी गोंधळात पडली. या दोघांमध्ये येथे कुठलीच राजकीय चर्चा झाली नसली तरी, हे दोघे एकत्र आल्यामुळे पुढची समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मावळची उमेदवारी शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना गेल्याने लक्ष्मण जगताप सध्या नाराज आहेत. जगताप मावळमधून तीव्र इच्छुक होते, त्यांनी शेवटपर्यंत मतदारसंघ भाजपला सोडवण्यासाठी प्रयत्न केला. परंतू युतीची उमेदवारी मिळवण्यात बारणे यांनी बाजी मारली. त्यामुळे नाराज जगताप आता युतीचा प्रचार करणार का? असा सवाल राजकीय जाणकारांना पडला असताना आज पार्थ पवार आणि लक्ष्मण जगताप एकत्र आल्यामुळे वेगळ्याच चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यावेळी स्थायी समितीचे सभापती विलास मडेगिरी, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक नाना काटे तसेच भाजपाचे नगरसेवकही उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details