महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अजित पवारांच्या शेजाऱ्याची आत्महत्या; सावकारी कायद्यांतर्गत 'या' राष्ट्रवादीच्या नेत्यांसह नऊ जणांवर गुन्हा - पुणे गुन्हे न्यूज

सावकारी प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये बारामती नगरपालिकेच्या मागील निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले नगरसेवक जयसिंग उर्फ बबलू देशमुख यांचा समावेश आहे. तसेच बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय काटे, निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांचा मुलगा मंगेश ओमासे यांचाही समावेश आहे.

अजित पवार
अजित पवार

By

Published : Nov 20, 2020, 12:53 PM IST

बारामती (पुणे)- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवावस्थानी राहणाऱ्या व्यापाऱ्याने आत्महत्या केली आहे. व्यापाऱ्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत राष्ट्रवादीमधील स्थानिक नेत्यांचा समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बारामतीत नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर सहा जण अटकेत आहेत.

सावकारी प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये बारामती नगरपालिकेच्या मागील निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले नगरसेवक जयसिंग उर्फ बबलू देशमुख यांचा समावेश आहे. तसेच बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय काटे, निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांचा मुलगा मंगेश ओमासे यांचाही समावेश आहे. याप्रकरणी प्रतीक प्रीतम शहा ( वय ३०, रा. सहयोग सोसायटी.बारामती) यांनी पोलिसत तक्रार दिली आहे.

ही आहेत आरोपींची नावे-
जयेश उर्फ कुणाल चंद्रकांत काळे (रा. भिगवण रोड, बारामती), जयसिंग उर्फ बबलू अशोकराव काटे- देशमुख (रा. देशमुखवस्ती, पाटस रोड, बारामती), संजय कोंडीबा काटे (रा. काटेवाडी, ता. बारामती), विकास नागनाथ धनके (रा. इंदापूर रोड, बारामती), मंगेश ओमासे (रा. सायली हिल, बारामती), प्रवीण दत्तात्रय गालिंदे (रा. खाटीक गल्ली, बारामती), हनुमंत सर्जेराव गवळी (रा. अशोकनगर, जैन मंदिराशेजारी, बारामती), संघर्ष गव्हाळे (रा. बारामती), सनी उर्फ सुनील आवाळे (रा. खंडोबानगर, बारामती) या नऊ जणांवर महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायद्यान्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

असे घडले प्रकरण-

व्यापारी प्रीतम शशिकांत शहा यांना नऊ जणांनी व्याजाने पैसे दिले होते. कर्जाने दिलेल्या पैशाच्या व्याज वसुलीसाठी तसेच बारामती शहरातील सहयोग सोसायटी येथील बंगला नावावर करून घेऊन प्रीतम शहा यांना मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. असे आत्महत्येपूर्वी शहा यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून नऊ जणांच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यानुसार प्रीतम शशिकांत शहा यांचा मुलगा प्रतिक शहा यांनी शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली.

सुसाईड नोट सापडल्याने दिली तक्रार-
प्रीतम शहा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. त्यांनी ही चिठ्ठी लेंगरेकर ट्रेडींग कॉर्पोरेशन या दुकानात ठेवली होती. दिवाळीच्या पाडव्याला दुकान उघडल्यानंतर त्यांनी लिहून ठेवलेली सुसाईड नोट शहा यांच्या कुटुंबियांना सापडली. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.

सहा जणांना अटक-
जयसिंग उर्फ बबलू अशोकराव काटे- देशमुख, जयेश उर्फ कुणाल काळे, संजय कोंडीबा काटे, हनुमंत सर्जेराव गवळी,प्रवीण दत्तात्रय गालिंदे, सनी उर्फ सुनील आवाळे या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अद्याप तिघे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर घटनेचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे करत आहे.

पोलिसांनी केले आवाहन-
दरम्यान या घटनेनंतर वरील व्यक्तींकडून कोणाला व्याजाच्या पैशासाठी मानसिक त्रास होत असेल तर त्यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details