पुणे- गेल्या वीस दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या दरडी कोसळल्या आहेत. मात्र, खेड तालुक्यातील आव्हाटमधील दरेवस्ती येथे डोंगरावरील जमिनीला मोठ्या आणि खोल भेगा पडून जमीन खचू लागली आहे. त्यामुळे येथील वस्तीला भूस्खलन होण्याचा मोठा धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण परसले आहे.
आव्हाट गावातील डोंगरावर भूस्खलन होण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने तहसीलदार सुचित्रा आमले यांनी तेथील माहिती घेतली. त्यानंतर आमले यांनी या भागाचा पंचनामा करण्याचे तलाठी (सर्कल) यांना आदेश दिले. याबाबतचा अहवाल भू-संशोधन विभागातील अधिकाऱ्यांकडे पाठवल्यानंतर त्यांच्याकडून या भागाची पाहणी केली जाणार आहे. दरम्यान या भागात पाऊस कायम असून डोंगरावरील जमिनीच्या भेगा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाने तात्काळ उपयोजना करण्याची स्थानिक नागरिकांकडून मागणी होत आहे.