पुणे -लॉकडाऊन काळात बंद असलेले मार्केटयार्डमधील व्यवहार येत्या रविवारपासून सुरू होणार आहेत. आडते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. मार्केटयार्डमध्ये भाजीपाला, फळांच्या गाड्या येण्यास शनिवारी 30 मे रात्रीपासून सुरुवात होईल. त्यानंतर रविवारी 31 मे पहाटे पाचपासून हा बाजार सुरू होईल.
गर्दी टाळण्यासाठी 50 टक्के आडते एका दिवशी तर 50 टक्के आडते दुसऱ्या दिवशी याप्रमाणे काम करतील. अशाप्रकारे बाजार सुरू राहिल्यास सोशल डिस्टन्स योग्य प्रमाणात राहील जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक बी. जी. देशमुख यांनी दिली.
लॉकडाऊनदरम्यान बंद असलेलं मार्केटयार्ड रविवारपासून सुरू गुलटेकडी परिसरातील भाजीपाला आणि फळांचा बाजार असलेले मार्केटयार्ड लॉकडाऊनमुळे मागील महिनाभरापासून बंद आहे. या मार्केटयार्डमध्ये काम करणारे बहुतांश कामगार रेड झोन परिसरात राहणारे असल्यामुळे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी, ग्राहकांना वाजवी दरात भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी बाजार समितीने मार्केटयार्डमधील व्यवहार परत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा -टोळधाडीचे आव्हान; कृषी मंत्रालय विदेशामधून मागविणार फवारणी यंत्र
सध्या सर्व बाजार परिसराचे निर्जंतुकीकरण सुरू आहे. बाजार सुरू होईल त्या दिवशी प्रवेशद्वारावर सॅनिटायझरची व्यवस्था केली जाईल. थर्मल स्क्रिनिंगद्वारे बाजारात येणाऱ्या प्रत्येकाचे तापमान नोंदवले जाईल. मर्यादित लोकांना प्रवेश दिला जाईल, अशाप्रकारच्या उपाययोजना करून मार्केटयार्ड परिसरातील व्यवहार सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेण्यात आला आहे.