पुणे- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज मंचर येथे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागणीचे निवेदन दिलीप वळसे पाटील यांना दिले. यावर वळसे पाटील यांनी ' मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दिलेले हे निवेदन कागद नसून संपूर्ण मराठा समाजाच्या भावना आहेत. या भावना राज्य सरकारच्या माध्यमातून न्यायालयीन प्रक्रियेत मांडण्याचा प्रयत्न करू. यामाध्यमातून संपूर्ण मराठा समाजाला न्याय देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयात मराठा क्रांती मोर्चा - मराठा आरक्षण न्यूज
मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती उठवावी आणि लवकरात लवकर मराठा समाजाला पूर्ववत आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आज मंचर येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने वळसे पाटील यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला.
मराठा समाजातील मुलांना नोकरी व शिक्षणासाठी आरक्षण मिळावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली. यावेळी आंदोलकांना बोलताना दिलीप वळसे-पाटील म्हणाले, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण व कामगार वर्गाला नोकरीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून कायद्याचा अभ्यास करून राज्य सरकार प्रयत्न करत आहे. संपूर्ण मराठा समाजाने आरक्षणावर स्थगिती आल्याने गैरसमज करून घेऊ नये, राज्य सरकार आपली भूमिका न्यायालयात योग्य पद्धतीने मांडून लवकरच मराठा समाजाला न्याय मिळवून देईल.