पिंपरी-चिंचवड (पुणे) - महापालिका निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असणार्यांसाठी पक्षाची दारे उघडी आहेत. भाजपातील अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक आहेत. काही कारणांमुळे जे पक्ष सोडून गेले. ते परत येत असतील व ते आपल्याकडील कार्यकर्त्यांपेक्षा जास्त ताकदीचे असतील तर त्यांना सामावून घेतले जाणार आहे, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पिंपरी चिंचवड येथे पत्रकारांशी बोलताना दिले.
भाजपातील अनेक नगरसेवक पक्षात येण्यासाठी उत्सुक -
अजित पवार म्हणाले की, आमच्याकडे कार्यकर्ते आहेत. त्यांच्यापेक्षा ताकदीचा नगरसेवक येणार असेल तर त्यांचे स्वागतच आहे. कोणत्याही निवडणुकीत मॅजीक फिगर महत्वाची असते. राज्यात २८८ पैकी ज्यांच्याकडे १४५ आमदार आहेत. तेच राज्यात सरकार स्थापन करू शकतात. तसेच महानगरपालिकेत पण आहे. पक्षाचे आता आहेत त्यापेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले पाहिजेत. सर्वांना माहिती आहे, की भाजपातील आताचे कितीतरी नगरसेवक असे आहेत की ज्यांना पाठीमागच्या कालखंडात मी त्यांना संधी दिली. त्यांना वेगवेगळी पदे दिली.