पुणे - जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव तालुक्यात शुक्रवारी 'आंबा महोत्सव -२०१९' भरवण्यात आला होता. यामध्ये ११ प्रकारचे आंबे ठेवण्यात आले होते. यावेळी आंबाप्रेमींना थेट शेतात जाऊन आंबे खाण्याची तसेच खरेदी करण्याची संधी मिळाली.
कोकणातील रत्नागिरी आणि देवगड येथील हापूस आंबा देशातच नाही तर जगातदेखील प्रसिद्ध आहे. कोकणातील आंब्याप्रमाणेच पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील आंबादेखील खायला चविष्ठ आहे. याठिकाणचे प्रदूषणमुक्त वातावरण, सह्याद्री पर्वत रांगेतील नैसर्गिक शेती, शुद्ध पाणी यामुळे या परिसरातील आंब्याला वेगळी चव, आकार, रंग, रूप, सुगंध आहे. हा आंबा आंबाप्रेमींपर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटन विभागाने या आंबा महोत्सवाचे आयोजन केले होते. यामध्ये हापूस, पायरी, दशेरी, राजापुरी, केशर, लंगडा, बेनीशान, मानखुलास, आम्रपाली, तोतापुरी आणि रत्ना हापूस, अशा सुमारे ११ प्रकारच्या आंब्यांचा समावेश होता.