पुणे -कंजारभाट समाजात लग्नापूर्वी कौमार्य चाचणी करण्याची प्रथा आहे. मात्र, या अनिष्ठ प्रथेला फाटा देत कौमार्य चाचणीस न करता लग्न करणार असल्याचा निर्णय एका तरुणाने घेतला आहे. त्याचे मगंळवारी (दि. 8 डिसें.) लग्न होणार आहे. यापूर्वी या समाजात अशाप्रकारे तीन विवाह झाले असून हा चौथा विवाह ठरणार आहे.
समाजाची भिती, दडपण झुगारून समाजातील काही धाडसी मुलींनीही कौमार्य परीक्षा देणार नाही, असे सांगत विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. समाजामध्ये आजही छुप्या स्वरूपात ही प्रथा काही ठिकाणी सुरू आहे. हे प्रकार पूर्णपणे थांबायलाच पाहिजे. हा प्रकार म्हणजे व्यक्तीस्वातंत्र्यावर, खासगीपणावर गदा आहे, असे विवेक तमायचीकर यांनी व्यक्त केले.
स्टॉप व्ही टेस्ट योजनेला प्रतिसाद
दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2018 साली 'स्टॉप व्ही टेस्ट' अभियान या समाजातील तरुण-तरुणींनी राबवले. ठाण्याच्या अंबरनाथ येथील विवेक तमायचीकर यांनी हे अभियान सुरू केले होते. 2018 मध्ये त्यांनी समाजाच्या रूढी-परंपरेच्या विरोधात जाऊन पिपरी-चिंचवड येथील तरुणीशी लग्न केले होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत या अनिष्ठ प्रथेला मूठमाती देण्यासाठी कौमार्य परीक्षा चाचणी न करता लग्न करण्याचा निर्णय आजच्या जोडप्याने घेतला.