पुणे- रिक्षा पंचायत पुणेतर्फे १ ऑक्टोबरला पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात रिक्षा बंदची हाक देण्यात आली आहे. याला महाराष्ट्र रिक्षा पंचायतीने विरोध दर्शवला असून यात रिक्षा चालकांनी सहभागी होऊ नये, असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले आहे.
रिक्षा बंदला महाराष्ट्र रिक्षा पंचायतने पाठिंबा न देता रिक्षा चालक आणि मालक यात सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे. येत्या ३० सप्टेंबरला संपूर्ण राज्यात महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या वतीने सरकार विरोधात बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे, असे कांबळे म्हणाले. त्याचबरोबर, रिक्षा पंचायतने पुकारलेला बंद हा अत्यंत चुकीचा आहे. सध्या रिक्षा व्यवसायच बंद आहे. त्यात तुम्ही बंद पुकारत आहात. एकीकडे अवघा महाराष्ट्र अनलॉककडे जात आहे. मात्र, रिक्षा पंचायत बंद पुकारत आहे. ही शोकांतिका आहे. रिक्षा पंचायत घेत असलेल्या अशा निर्णयांमुळे रिक्षा चालकांचे अनेक वर्षांपासून नुकसान झालेले आहे. या बंदला आमचा पाठिंबा नाही. त्यात कोणताही रिक्षा चालक सहभागी होणार नाही. तसेच, रिक्षा चालकाने सहभागी होऊ नये, असे आवाहन कांबळे यांनी केले.